पुणे: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे विभागाकडून मोठे काम हाती घेण्यात आले आहे. हडपसर आणि घोरपडी येथील कोच मेंटेनन्स कॉम्प्लेक्सदरम्यान तिसरी रेल्वे मार्गिका विकसित करण्याचे काम होणार आहे. या प्रकल्पासाठी पुणे तसेच हडपसर यार्डमध्ये विविध तांत्रिक कामे केली जाणार आहेत. त्यामुळे 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या काळात रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

मेगा ब्लॉकच्या कालावधीत पुणे विभागातून धावणाऱ्या अनेक मेल-एक्सप्रेस, पॅसेंजर, डेमू आणि लोकल सेवांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 42 रेल्वेगाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या गाड्यांच्या एकूण 98 फेऱ्या प्रभावित होणार आहेत.

याशिवाय 25 गाड्यांचे मार्ग बदलून त्या पर्यायी मार्गाने चालवण्यात येतील. यामुळे त्यांच्या 36 फेऱ्यांवर परिणाम होणार आहे. काही रेल्वेगाड्यांच्या थांब्यांमध्येही बदल केला जाणार आहे. तब्बल 35 गाड्या त्यांच्या नियमित स्थानकाऐवजी इतर ठिकाणी थांबवल्या किंवा तेथून रवाना केल्या जाऊ शकतात.

दरम्यान, 22 गाड्यांचे नियमन केले जाणार असून आणखी 14 गाड्यांच्या वेळेत फेरबदल करण्यात आला आहे. पुणे-मुंबई, पुणे-सोलापूर, पुणे-नागपूर आणि पुणे-हावडा या प्रमुख मार्गांवरील रेल्वे सेवांनाही या कामाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
कधी आणि किती वेळ असेल ब्लॉक?
19 ते 23 सप्टेंबर या काळात पुणे-हडपसर मार्गावर दररोज दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत अप आणि डाऊन मार्गावर काम केले जाणार आहे. 24 सप्टेंबरपासून या ब्लॉकचा कालावधी तुलनेने कमी केला जाईल.
त्यानंतर 3 ऑक्टोबरला हडपसर यार्डमध्ये सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत विविध कामे केली जातील. 4 ऑक्टोबरला मोठ्या प्रमाणावर काम होणार असून मध्यरात्रीपासून सकाळी 10:30 पर्यंत रेल्वे ब्लॉक असेल. त्यानंतर सिग्नल आणि दूरसंचार यंत्रणेची कामे सकाळी 10:30 ते सायंकाळी 6:30 पर्यंत केली जाणार आहेत.
त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी तिकीट काढण्यापूर्वी संबंधित गाडीची सद्यस्थिती तपासणे आवश्यक आहे. प्रवासाच्या दिवशी गाडी रद्द आहे का, मार्गात बदल झाला आहे का किंवा वेळापत्रकात फेरबदल करण्यात आला आहे का, याची खात्री करूनच प्रवासाचे नियोजन करावे.







