पिंपरी : मावळ विधानसभा मतदार संघातील लढत सर्वाधिक लक्षवेधी राहिली आहे. महायुतीतील नाराजांनी जन्मास घातलेल्या मावळ ‘पॅटर्न’ला मोठा धक्का देत. पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील शेळके विजयी झाले आहेत. त्यांना एक लाखाचे मताधिक्य मिळाले आहे.
मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष आणि महायुतीतील नाराजांनी अपक्ष उमेदवार बापूराव भेगडे यांना पाठिंबा दिल्याने झालेल्या लढतीमुळे मावळकडे राज्याचे लक्ष लागले होते. या मतदार संघात ३२,३५८ म्हणजेच १.४३ टक्के मतदान वाढले आहे. या वाढीव मतदानाने मावळ ‘पॅटर्न’ला मोठा धक्का दिला आहे. आमदार सुनील शेळके पूर्वी भाजपमध्येच होते. २०१९ मध्ये भाजपमध्ये बंडखोरी झाली. उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांना पराभूत केले होते. तेव्हापासून आमदार शेळके आणि मावळ भाजपमध्ये टोकाचा राजकीय संघर्ष बघायला मिळाला आहे.
मावळ मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीपासूनच अजित पवारांचे उमेदवार सुनील शेळके यांनी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाली. ती आघाडी अकराव्या फेरीपर्यंत कायम राहिली. अकराव्या फेरीअखेर एकूण 1 लाख 04 हजार 263 मतांची मोजणी पूर्ण झाली असून सुनील शेळके यांना 75 हजार 449 तर अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना 26 हजार 758 मतं मिळाली आहे.