हनुमंत चिकणे
बारामती, (पुणे) : बारामतीमधील एका व्यावसायिकाच्या पत्नीला मारहाण करुन, घरातील रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे एक कोटी रूपयांचा ऐवज चोरून नेणाऱ्या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) विभागाला यश आले आहे. व्यावसायिकाच्या घरावर दरोड्यासाठी काळ व वेळ ठरवणाऱ्या फलटण तालुक्यातील एका ज्योतिषालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चोरीस गेलेल्या एक कोटीपैकी ७७ लाखांचा ऐवज आरोपींकडून जप्त केल्याची माहिती पोलीस अधिक्षक अंकीत गोयल यांनी दिली.
पोलिसांनी सचिन अशोक जगधने (वय ३०, रा. गुणवडी, २९ फाटा, जि. प. शाळेजवळ, ता. बारामती), रायबा तानाजी चव्हाण (वय ३२, रा. शेटफळ हवेली, जाधववस्ती, कॅनॉलजवळ, ता. इंदापूर), रवींद्र शिवाजी भोसले (वय २७, शेतमजुरी, रा. निरा वागज, घाडगेवाडी रोड, भोसलेवस्ती, पाण्याच्या टाकीजवळ, ता. बारामती), दुर्योधन उर्फ दीपक उर्फ पप्पू धनाजी जाधव (वय ३५, व्यवसाय खासगी नोकरी, रा. जिंती, हायस्कूलजवळ, ता. फलटण, जि. सातारा), नितीन अर्जुन मोरे (वय ३६, रा. धर्मपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) या पाच आरोपींसह ज्योतिषी रामचंद्र वामन चव्हाण (वय ४३, मूळ रा. आंदरूड, ता. फलटण, जि. सातारा, सध्या रा. वडूज, पेडगाव रोड, प्रतिक ढाब्याजवळ, ता. खटाव, जि. सातारा) या सहा जणांना अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवकातेनगर येथे सागर शिवाजी गोफण व त्यांची पत्नी तृप्ती या दोन मुलांसह राहतात. २१ मार्चला सागर गोफणे हे तिरूपती बालाजी येथे देवदर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांची पत्नी मुलांसह घरी होती. या वेळी संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास चार अनोळखी चोरट्यांनी घराच्या कंपाउंड भिंतीवरून आत प्रवेश केला. तृप्ती गोफणे यांना मारहाण करून, हातपाय बांधले. तोंडात कापडाचा बोळा कोंबून, घरातील ९५ लाख ३० हजार रुपये रोख रक्कम, २० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व तीन मोबाईल फोन असा तब्बल १ कोटी ७ लाख २४ हजार ३०० रूपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. याबाबत बारामती पोलीस ठाण्यात तृप्ती गोफणे यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी घटनेची पाहणी करून, गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिल्या होत्या. गुन्ह्याची माहिती पोलीस सीसीटीव्ही, गोपनीय बातमीदार, तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेवून घेत असताना पोलिसांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की, संबंधित गुन्हा हा एमआयडीसीतील मजूर कामगारांनी केला आहे. त्यानुसार वरील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली.
दरम्यान, त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, सागर गोफणे हा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत असून, त्याच्याजवळ भरपूर पैसे असल्याची माहिती आरोपी सचिन जगधने याला मिळाली होती. त्याने गुन्ह्याचा कट रचला तसेच गुन्हा करण्यापूर्वी आरोपींनी ज्योतिषी रामचंद्र चव्हाण याच्याकडून मुहूर्त काढून त्याच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून पोलिसांनी तब्बल ७६ लाख ३२ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, राहुल गावडे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, प्रदीप चौधरी, शिवाजी ननवरे, अमित सिदपाटील, गणेश जगदाळे, सहायक पोलीस निरीक्षक रविराज कोकरे, बाळसाहेब कारंडे, पोलीस हवालदार सचिन घाडगे, ज्ञानेश्वर क्षिरसागर, अजित भुजबळ, अभिजीत एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, राजू मोमीण, अतुल डेरे, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, दीपक साबळे, विक्रम तापकीर, विजय कांचन, पोलीस नाईक अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, संदीप वारे, संदीप भोईटे, धिरज जाधव, अक्षय नवले, मंगेश भगत, मुकुंद कदम, प्रमोद नवले, चापोकॉ दगडू विरकर, ईटे अक्षय सुपे यांनी केली. पुढील तपास बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, पोलीस शिपाई दीपक दराडे हे करत आहेत.