पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीवर अज्ञात आरोपींनी गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करून हत्या केल्याची घटना घडली होती. अविनाश बाळू धनवे (वय 34) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. ही घटना १६ मार्च रोजी संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर येथील हॉटेलमध्ये ही घटना घडली. या घटनेनं राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होतं तपासाची चक्रं फिरवली. या गोळीबार प्रकरणात आतापर्यंत अकरा आरोपी निष्पन्न झाले असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती एसपी पंकज देशमुख यांनी दिली आहे. दरम्यान, ज्याचा खून झाला तो पण मोक्क्यातला आरोपी होता.
तसेच ज्यांनी हल्ला केला ते पण रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. हे सर्व गुन्हेगार पुण्यातील आळंदी नजीकच्या चऱ्होली परिसरातले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अविनाश धनवे हा पंढरपूरला जात असताना त्याच्या मिञाशी संगनमत करून हा हल्ला झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
लँड माफियांच्या टोळी युद्धातूनच खून
अविनाश धनवे हत्याकांडातील सर्व आरोपी हे लँड डिलिंगशी संबंधित आहेत. जमीन खरेदी विक्री तसेच बेकायदा ताबा मिळवणे अशा व्यवहारात त्यांच्यावर आळंदी, चाकण आणि चऱ्होली परिसरात अनेक गुन्हे दाखल आहेत. लँड माफियांच्या टोळी युद्धातूनच ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही राज्यभरात व्हायरल झालं आहे, त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली आहे.