उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचनजवळील शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. मंगळवारी (ता. १६) पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास एका बंगल्याचे चार चोरट्यांनी कडी कोयंडे तोडून प्रवेश केला. पण त्यांच्या हातात काहीच मिळाले नाही. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदवणे परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ मागील एक ते दीड महिन्यांपासून सुरु आहे. दुचाकी गाड्या चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत. तर सदनिकांचे कडी कोयंडे तोडून ऐवज चोरून नेण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिक अस्वस्थ झाले आहेत. या घरामध्ये चोरटे प्रवेश करतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील धरकवस्ती येथे संतोष मोहिते हे कुटुंबीयांसोबत राहतात. मंगळवारी पहाटे काही चोरट्यांनी मोहिते राहत असलेल्या घरी प्रवेश केला. यावेळी परिसरात असलेली भटकी कुत्री चोरट्यांना पाहून मोठमोठ्याने ओरडत होते. यावेळी चोरट्यांनी बाहेरच्या बाजूला असलेल्या काही खोल्यांचे कडी कोयंडे तोडले.
यावेळी त्यांच्या हातात मोठी कटावणी दिसून येत आहे. तर सदरचे चोर हे ३० ते ३५ या वयोगटातील असल्याचा अंदाज असून त्यांनी डोक्याला काळ्या व पांढऱ्या रंगाचे टोप घातलेले आहेत. चोरीच्या उद्देशाने ते बंगल्यात वावरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रित झाले आहेत. सदर प्रकरणी अद्याप उरुळी कांचन पोलीस ठाण्यात याबाबत खबर देण्यात आली नाही.
दरम्यान, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत घराचा दरवाजा तोडून ५० हजार रोख रक्कम, सोन्या- चांदीचे दागिने असा २ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील लक्ष्मीनगर, बायफ रोड येथे घडली होती. तसेच लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिवरी या ठिकाणी दरोडेखोरांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत तब्बल १६ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने रोख रक्कम चोरून नेली आहे. या सशस्त्र दरोड्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून पोलिसांपुढे या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान उभे राहीले आहे.