शिरूर : हरीयाणा व राजस्थान राज्यातील ए.टी.एम. सेंटरची चोरी करणारी टोळी ए.टी.एम. सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना टोळीसह कंटेनर व दरोडयाचे साहित्य स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांनी कारवाई करून ताब्यात घेतले आहे. या कारवाईमध्ये तिघा आरोपींना जेरबंद करण्यात आले असून दोघे जण अंधाराचा फायदा घेवून पळून गेले आहेत. तसेच १५ लाख १७हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हरीयाणा व राजस्थान राज्यात ए.टी.एम. सेंटरची चोरी करणारी टोळी महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्हयात आलेली असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणच्या पथकास मिळाली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय यंत्रणा सतर्क करून हरीयाणा व राजस्थान राज्यातून आलेल्या टोळीची माहिती घेण्यास सुरूवात केली असता, सदरची टोळी ही RJ-52-GA-7916 या नंबरचा टाटा कंपनीचा कंटेनर घेवून आलेले असून सदरची टोळी या मालवाहतूक कंटेनरमधून येतात व ए.टी.एम. सेंटर चोरी करतात.
ही टोळी ही पुणे-नगर हायवेवरील सरदवाडी गावचे हद्दीतील हरीयाणा मेवाती ढाबा या ठिकाणी कंटेनर उभा करून थांबलेली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळाली. बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा पथकाने शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व स्टाफ यांचे मदतीने दि. ०४ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पोलीस पथकाने अचानक छापा टाकत कंटेनरसह तीन इसमांना ताब्यात घेतले. मात्र अंधाराचा फायदा घेवून त्यांचे इतर दोन साथीदार पळून गेले.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपींची नावे कुतुबुद्दीन अख्तर हुसेन (वय ३१ रा सोमका ता पहरी जि भारतपूर, राजस्थान), यसीन हारून खान (वय ३२ रा गुंडेता ता पुन्हान जि नुह, हरियाणा), राहुल रशीद खान (वय ३२ रा फलेंडी ता पुन्हान जि नुह, हरियाणा) अशी असून इतर आरोपी नौशाद उर्फ नेपाळी (पूर्ण नाव माहित नाही) लेहकी (पूर्ण नाव माहित नाही) दोघे (रा.घासैडा गांधीग्राम जि. नुह हरियाणा) हे दोघे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत.
आरोपींच्या ताब्यातून RJ-52-GA-7916 या नंबरचा टाटा कंपनीचा कंटेनर, एटीएम मशीन कटिंग करण्यासाठी लागणारे गॅस कटर, गॅस टाकी, कटावणी, पहार, स्प्रे बॉटल, रस्सी इत्यादी साहित्य कि. रू. १५ लाख १७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गु. र.नं. ९२४/२०२४ भा.न्या.सं. ३१०(४) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नमुद आरोपी यांनी महाराष्ट्रात प्रवेश केल्यापासून कोठे कोठे गुन्हा केला आहे, त्यांचेकडे मिळून आलेल्या दरोडयाचे साहित्याचा वापर करून सदरची टोळी कोठे गुन्हा करणार होती, अशा विविध मुद्दयांवर स्थानिक गुन्हे शाखाचे पथक व शिरूर पोलीस स्टेशनचे तपास पथक आरोपीकडे तपास करत आहेत, सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची दि. ०७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे. असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशन करत आहे.