उरुळी कांचन : पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील कस्तुरी कॉम्प्लेक्स येथे अज्ञात चार चोरट्यांनी डीझेल टाकून दुकान पेटवून देऊन फोडण्याचा प्रयत्न केला आहे. शुक्रवारी (ता. 22) पहाटे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार समीर मांजरे यांचे कस्तुरी कॉम्प्लेक्स येथे पान विक्रीचे दुकान आहे. त्याच्या शेजारी डोळ्यांचा दवाखाना आहे. नेहमीप्रमाणे दोन्ही दुकाने बंद करून घरी गेले होते. पहाटे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चार चोरटे दुकानाच्या बाहेर आले व त्यांनी दगडाने दुकान फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. दुकानाचे कुलूप न तुटल्याने चोरट्यांने बाटलीत डीझेल आणून दुकान पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही दुकानात प्रवेश करता आला नाही. सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस कसा तपास करून आरोपी पकडतात याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील खेडेकर मळा परिसरात पेट्रोल पंपाच्या समोर रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या अवजड वाहंनामधून डीझेल चोरी केली जात आहे. अलिशान गाडीतून येऊन सदरची चोरी केली जात असून व्यायाम करण्यासाठी गेलेल्या काही नागरिकांवर या डीझेल चोरट्यांनी थेट दगडाने हल्ला चढवला असल्याची घटनाही मागील आठ दिवसांपूर्वी घडली आहे.
गुन्हे शोध पथकाची सुमार कामगिरी..
एखादा गुन्हा घडला, तर त्या ठिकाणची सर्व माहिती घेऊन तत्काळ त्या आरोपीपर्यत पोहोचण्याचे काम गुन्हे शोध पथकाचे आहे. मात्र, उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाची कामगिरी काहीच नाही. तगडी पोलिस यंत्रणा असतानाही उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा वाढत्या घटनांमुळे उरुळी कांचन व परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. तर या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर आपणच सावध होऊन आपल्या वस्तूंची काळजी घ्यावी, अशी चर्चा नागरिकांमध्ये चांगलीच रंगली आहे. तर काही चोरट्यांचे सीसीटीव्ही पोलिसांना मिळाले आहे. तरीही अद्यापपर्यंत तपास लागू शकला नाही.
View this post on Instagram
गस्त वाढवण्याची गरज..
वर्दळीच्या ठिकाणी चोरी, अपार्टमेंटमध्ये चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पार्किंग असो वा रस्त्यालगत, तसेच दुकानाजवळ लावलेल्या दुचाकी व चारचाकी चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर उरुळी कांचन शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याबाबत उरुळी कांचन पोलिसांकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, उरुळी कांचन पोलिसांकडून नागरिकांचा अपेक्षा भंग झाल्याची चर्चा सुरु आहे.