भोर : भांबवडे (ता. भोर) येथे जमिनीच्या वादातून एका कुटुंबाच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना १७ ऑगस्ट रोजी रात्री घडल्याची तक्रार राजगड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ११ जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत ऋतीक राजाराम सोनवणे (वय २६, व्यवसाय नोकरी, रा. भांबवडे, ता. भोर) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, १७ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ११.०५ वाजण्याच्या सुमारास भांबवडे गावच्या हद्दीत फिर्यादी यांच्या राहत्या घरात हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. ‘परड्याची जागा आमची आहे,’ असे म्हणत जमिनीच्या कारणावरून संबंधित व्यक्तींनी घरात अनधिकृतपणे प्रवेश केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

तक्रारीनुसार, संबंधितांनी लाकडी काठी, कोयता व लोखंडी रॉड तसेच हाताने मारहाण केली. यावेळी शिवीगाळ करून दमदाटी केल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे. या मारामारीदरम्यान फिर्यादीच्या आईचे मंगळसूत्र कुठेतरी पडून गहाळ झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात महेश बाबासो सोनवणे, बाबासो सिताराम सोनवणे, शांताबाई बाबासो सोनवणे, मनिषा महेश सोनवणे, मनिष दिपक शिर्के, ओंकार दिपक शिर्के, कुनाल पायगुडे तसेच जयश्री, सारिका, सुप्रिया आणि राजश्री अशा एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काही आरोपींची पूर्ण नावे व पत्ते तक्रारीत उपलब्ध नसल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे.
या घटनेची तक्रार १८ ऑगस्ट रोजी राजगड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार निंबाळकर करीत असून, प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमागील जमिनीचा वाद, मारहाणीची नेमकी परिस्थिती आणि तक्रारीतील आरोपांची सत्यता याबाबत पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.







