नांदेड: नांदेड जिल्ह्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले होते. सक्षम ताटे आणि आंचल मामिडवार यांची प्रेमकहाणी एका अत्यंत भीषण वळणावर येऊन थांबली. आंतरजातीय विवाहाला आंचलच्या कुटुंबीयांचा कडाडून विरोध होता, ज्यामुळे सक्षमची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर आंचलने आपल्याच घरच्यांविरोधात लढा देत न्यायाची मागणी केली होती. इतकेच नाही तर, सक्षमच्या मृतदेहाशी विवाह करून त्याच्या कुटुंबाची जबाबदारी उचलण्याचा निर्णय तिने घेतला होता. मात्र, काही महिन्यातच आंचलने सक्षमचे घर सोडल्याने हे प्रकरण चर्चेत आले होते.

आंचलने सक्षमचा भाऊ म्हणजेच दिराच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आंचलच्या मते, तो तिच्याशी चुकीच्या पद्धतीने वागत असे आणि स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा. याबद्दल सक्षमच्या आईला कल्पना दिली होती, पण त्यांनी विश्वास ठेवला नाही, असे तिचे म्हणणे आहे. सुरक्षिततेसाठी आपण माहेरी परतल्याचा दावा तिने केला आहे.

दुसरीकडे, सक्षमच्या आईने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्या दुसऱ्या मुलावर झालेले हे आरोप ऐकून त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर काही मेसेज सादर केले, ज्यातून आंचल आणि सक्षमच्या भावाचे संवाद आदरयुक्त असल्याचे दिसून येते. सक्षमचा भाऊ आंचलला वाहिनी म्हणत होता. . ‘बोल की बाळा’, असे आंचल सक्षमच्या भावाला बोलत होती. . ‘आमचे एक लेकरू तर गेले. आता दुसऱ्या लेकरावर तरी असे आरोप करू नये’ असे सक्षमच्या आईने सांगितले.
या पुराव्यांच्या आधारे सक्षमच्या आईने आंचलचे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. ‘आता आमचा एकच लेकरू आहे, त्याला तरी बदनाम करू नका’, अशी आर्त हाक त्यांनी दिली आहे. सध्या या वादात नक्की कोणाचे म्हणणे खरे, याचा शोध सुरू असून हे प्रकरण चर्चेचा विषय ठरले आहे.







