पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडपिंपरी-चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 37 वर्षीय महिला रुग्णाने डॉक्टरवर गैरवर्तनाचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी निगडी पोलिसांनी संबंधित डॉक्टरला अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला चिंचवडमधील संभाजीनगर परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत्या. रविवारी पहाटेच्या सुमारास डॉ. धैर्यशील शेटक (वय 27) हे वॉर्डमध्ये आले. उपचार प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगत त्यांनी महिलेच्या पायाला लावलेले स्टॉकिंग व्यवस्थित करण्यासाठी तपासणी सुरू केली.

मात्र, या दरम्यान डॉक्टरांनी आपल्या शरीराला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. घटनेनंतर महिलेने तत्काळ आक्षेप घेतला आणि घडलेला प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे याबाबत चौकशी केली.
प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पीडित महिलेने निगडी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून संशयित डॉक्टरला अटक केली आहे.
घटनेची सत्यता पडताळण्यासाठी पोलिसांकडून रुग्णालयातील कर्मचारी, उपलब्ध नोंदी आणि त्या वेळची परिस्थिती यांची चौकशी करण्यात येत आहे. तसेच रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांचाही तपास केला जात असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास सुरू ठेवला असून तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.






