नागपूर: नागपुरातील 24 वर्षीय महिलेने बलात्कार, ब्लॅकमेलिंग, खंडणी आणि जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी सोनेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी अद्याप फरार आहे. (Nagpur Viral Video)

तक्रारीनुसार, पीडित महिला प्रॉपर्टी व्यवसायाशी संबंधित काम करते. तिचे पती भारतीय वायुसेनेत अधिकारी असून दुसऱ्या शहरात कार्यरत आहेत. फेब्रुवारी 2025 मध्ये तिचा जुना वर्गमित्र अयाज ताज मदारे याने प्लॉट खरेदीच्या निमित्ताने तिच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्याने तिला वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये बोलावल्याचा आरोप आहे.

महिलेच्या म्हणण्यानुसार, हॉटेलमध्ये तिला गुंगीचे औषध मिसळलेले पेय देण्यात आले. ती बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि त्याचे फोटो व व्हिडिओ तयार करण्यात आले. नंतर या व्हिडिओंचा आधार घेऊन आरोपीने तिला धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. बदनामीची भीती दाखवून तिच्याकडून सुमारे 3.09 लाख रुपये घेतल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, मे 2025 मध्ये आरोपी तिला नागपूरजवळील कलमेश्वर परिसरात घेऊन गेला. तेथे आणखी दोन व्यक्तींशी तिची भेट घडवून आणण्यात आली. एका निर्जन ठिकाणी काही धार्मिक विधी करण्यात आले आणि तिचे धर्मांतर झाल्याचा दावा करण्यात आल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले आहे. त्यानंतर पुन्हा तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी पीडित महिलेने संपूर्ण घटना आपल्या पतीला सांगितली. त्यानंतर कुटुंबाच्या पाठिंब्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी अयाज ताज मदारे आणि अमीन शेख यांना अटक केली असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
या प्रकरणात बलात्कार, खंडणी, धमकी, जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न तसेच अंधश्रद्धा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास नागपूर पोलीस करत आहेत.






