उरुळी कांचन, (पुणे) : येथील बँक ऑफ इंडिया शाखेत कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला ग्राहक वैतागले आहेत. ग्राहकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित न देता अरेरावी करत ग्राहकांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचा प्रकार येथील शाखेत होऊ लागला आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना झोनल कार्यालयाकडून समज देण्याची मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून, जमा होणारे पैसे काढण्यासाठी, जमा होणाऱ्या पेन्शनचे पैसे काढण्यासाठी, बँकेत येणाऱ्या महिला व जेष्ठ नागरिक ग्राहकाला बँकेचे कर्मचारी उडवा-उडवीची उत्तरे देत उर्मटपणाने बोलत आहेत. एकाच कामासाठी महिना महिना हेलपाटे मारायला लावत अडवणूक करीत त्रास देत आहेत. बँकेतील कर्मचारी पेन्शनधारक वयोवृद्ध नागरिकांना अपमानकारक वागणूक देत असल्याबद्दल तसेच बँकेतील सुविधांचा लाभ न देत असल्याबद्दल अनेक तक्रारी नागरिक करीत आहेत.
बँक ऑफ इंडिया शाखेतील खातेदार बंद पडलेल्या बचत खात्याचे पुनरुज्जीवन करणे किंवा केवायसी करणे, अद्ययावत केलेले आधार कार्ड बँक खात्याशी जोडणे, बँक खात्याला मोबाईल नंबर जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी ग्राहक बँकेत गेले असताना, त्यांना योग्य ते मार्गदर्शन न करता प्रत्येक कामाला आठ-आठ दिवसाच्या फरकाने बोलवत हेलपाटे मारण्यास भाग पाडले जात आहे. तरीही त्या ग्राहकाला त्यांच्या खात्याची अद्ययावत स्थिती सांगितली जात नाही किंवा त्यांच्या खात्यातून आर्थिक व्यवहार केले जात नाहीत,त्यामुळे या ग्राहकांची आर्थिक कुचंबना होऊन नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे अशी खंत अनेक महिला ग्राहकांनी बोलून दाखवली.
बँक ऑफ इंडिया हि उरुळी कांचन मधील मुळात 1968 पासून कार्यरत असलेली सर्वात मोठी बँक म्हणून नावारूपाला आली होती. मात्र सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञान युक्त यंत्रणांनी सुसज्ज झालेली, यंत्रणा हाताशी असताना केवळ कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे या बँकेच्या ग्राहकांना सुरळीत सेवा मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे. गले लठ्ठ पगार घेणारे कर्मचारी शाखा व्यवस्थापकाच्या सूचनांना किंमत देत तर नाहीतच पण बँकेच्या आवारामध्ये (बिजनेस करस्पॉन्डन्स) व्यवसाय प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेल्या महिला प्रतिनिधीकडे आपल्या कामासाठी जाण्यास सांगतात व ग्राहकाची पिळवणूक करीत आहेत.
जास्तीत जास्त ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची बंद पडलेली खाती चालू करण्यासाठी, केवायसीचे काम सध्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने, शाखेमध्ये गोंधळ होत आहे. लवकरात लवकर ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये सुरळीतपणा आणण्याचा प्रयत्न राहील. आरबीआयच्या सूचनेप्रमाणे कर्मचाऱ्यांनी जेवणाची एकत्र सुट्टी न घेता कामकाज बंद न ठेवता या काळातही ग्राहकांना सेवा पुरविण्यात येईल.
कुंभार, वरिष्ठ व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया शाखा, उरुळी कांचन, (ता. हवेली)
लहान कामांसाठीही कर्मचारी विलंब करतात. एका दिवसांत होणाऱ्या कामांसाठी अनेकदा हेलपाटे मारावे लागतात. त्यातही तासनतास ताटकळत बसल्यानंतर संबंधित अधिकारीसर्व्हर डाऊन असल्याचे व कर्मचारी नसल्याचे कारण देत वेळ मारून नेतात. याबाबत जाब विचारणाऱ्याचे काम करण्यास हेतूपुरस्सर उशिरा करण्याचा प्रकार बॅंकेत होतअसल्याने खातेधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या शाखेतील कर्मचाऱ्यांवर त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाने कडक कारवाई करीत, बँकेच्या ग्राहकांना सुरळीत व विनाविलंब सेवा पुरवावी.
रामभाऊ तुपे, हवेली तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्य, उरुळी कांचन, (ता. हवेली)