पुणे, ता. 20 : कोंढवा परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने (ANTF) आज गुरुवारी (ता.20) पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या दोघांसह सेवन करणाऱ्या 43 जणांना ताब्यात घेतले. कोंढवा येथील शिवनेरी गल्ली, काकडे वस्तीशेजारील दर्ग्याजवळ ही धडक कारवाई करण्यात आली.

या कारवाईत गणेश सिद्धू पाटोळे याच्याकडून सुमारे तीन किलो गांजा आणि 26 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच अज्जू भाई ऊर्फ अजु अहमद शेख याच्यासह अन्य संशयितांवरही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश पाटोळे हा अज्जूच्या सांगण्यावरून गांजा विक्री करीत असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. विशेष म्हणजे, पाटोळे याच्यावर यापूर्वीही एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

दरम्यान, कोंढवा परिसरात पहाटे अचानक ANTFचे पथक दाखल झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. गांजा विक्रीचे जाळे आणि सेवन करणाऱ्यांवर एकाचवेळी कारवाई केल्याने अंमली पदार्थांच्या व्यवहाराला मोठा धक्का बसला आहे.
ही कारवाई अंमली पदार्थ टास्क फोर्स, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या पथकाने केली. पथक प्रमुख ज्योतिप्रिया सिंह, डीआयजी प्रवीण पाटील, आयपीएस अनुज तारे, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदिनी वग्यानी, डीवायएसपी तावसकर, पोलीस उपनिरीक्षक सरवदे, सहाय्यक फौजदार तुपे, पोलीस हवालदार कळसकर, पोलीस हवालदार ढेभे, पोलीस कर्मचारी साबळे व होळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या कारवाईनंतर कोंढवा परिसरातील अंमली पदार्थांच्या व्यवहारामागील मुख्य सूत्रधार कोण? गांजा कुठून आणला जात होता आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे? याचा तपास ANTF कडून सुरू आहे.







