दौंड, ता. 20 : दौंड शहरात 70 वर्षीय वृद्ध महिलेचा धारदार हत्याराने गळयापासून शिरच्छेद करून निर्घृण खून करणाऱ्या दोन संशयित आरोपींना दौंड पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 12 तासांच्या आत गजाआड केले आहे. बुधवारी (ता. 19) दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास आर.बी. 1 नगरमोरी परिसरात हा प्रकार उघडकीस आला.

विकी उर्फ विक्रम धनराज अल्हाट (रा. समतानगर, दौंड, ता. दौंड) व प्रसाद बाबूलाल चव्हाण (रा. आर.बी. 1 नगरमोरी, दौंड, ता. दौंड) अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयित आरोपींची नावे आहेत. तर सुमन किसन शिंदे (वय 70, रा. आर.बी. 1 नगरमोरी, दौंड) असे निघृण खून झालेल्या दुर्दैवी वृद्ध महिलेचे नाव आहे. याबाबत मयत महिलेची मुलगी सौ. तृप्ती सचिन हिरवे (वय 45,रा. रामलिंग रोड, शिरूर) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. 19) दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास आर.बी. 1 नगरमोरी परिसरात अज्ञाताने कोणत्याही कारणावरून अत्यंत निर्घृणपणे धारदार हत्याराने सुमन शिंदे यांचा गळ्यापासून शिरच्छेद केला आणि हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने कापलेले शिर शरीरापासून वेगळ्या ठिकाणी नेऊन टाकले. अशी माहिती दौंड पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणी मयत महिलेची मुलगी तृप्ती हिरवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक व वरिष्ठांच्या सूचनेनुसार दौंड पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांची स्वतंत्र विशेष तपास पथके तयार करण्यात आली. गुप्त बातमीदारांमार्फत आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेऊन खाकीचा दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. हत्याकांड घडल्यापासून अवघ्या 12 तासांच्या आत या दोन्ही आरोपींना निष्पन्न करून पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दरम्यान, वृद्ध महिलेची हत्या करण्यामागचे मुख्य कारण काय होते? चोरीच्या उद्देशाने हा प्रकार घडला की जुन्या वैमनस्यातून? याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोकरे करत असून, आरोपींना न्यायालयासमोर हजर करून पोलीस कस्टडी मिळवली जाणार आहे. अवघ्या काही तासांत आरोपींना जेरबंद केल्याबद्दल दौंड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, विनायक सपाटे, पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, दौंडचे ज्ञानेश्वर राऊत, सहायक फौजदार आसिफ शेख, सचिन घाडगे, पांडुरंग थोरात,पोलीस हवालदार गुरुनाथ गायकवाड, सुभाष राऊत, विकास कापरे, नितीन बोराडे, धनंजय गाढवे, निखिल जाधव, आमिर शेख, किरण पांढरे, महेंद्र लोहार, पवन माने, सोमनाथ चौंडे, निखील पवार,हजारे, अक्षय कुंभार, ओमनाथ तुमकुटे, तांबोळी यांनी सहभाग घेतला.






