लहू चव्हाण
Ambedkar Jayanti 2023 पाचगणी : फटाक्यांची आतषबाजी आणि डोळे दिपवणाऱ्या लाईट शो अन जयभीमचा अखंड जयघोष करत भारतीय राज्यघटनेने शिल्पकार, भारतरत्न तथा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती पाचगणी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सायंकाळी ६ वाजता पाचगणी व परिसर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष सुनील शरद बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील विविध तरुण मंडळांचे कार्यकर्ते यांच्यावतीने फुलांनी व विद्युत रोषणाईने सजविलेल्या रथामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून टेबल लॅंण्ड नाक्यावरुन मुख्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. बेल एअर हाॅस्पिटल मार्गे बेबीपाॅंईट येथून मुख्य मार्गावर मिरवणूक आली तर, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आंबेडकर उद्यान येथे मिरवणूकीचा समारोप झाला.
भिमसैनिक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी…!
पाचगणी शहरातून व परिसरातील गावांमधून भिमसैनिक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते .हातात निळा झेंडा व जयभिमचा गजर सुरू होता. मिरवणुकीत महिला व युवतींची संख्या लक्षणीय होती. मिरवणुकीत सामिल झालेल्या प्रत्येकांने पांढऱ्या, निळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते. त्यामुळे परिसर भीममय झाला होता.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकास यात्रेचे स्वरूप आले होते. शहरातील बाजारपेठेत दुतर्फा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जागवणारे फ्लॅक्स बोर्ड लावण्यात आले होते .ठिकठिकाणी कमानी उभारण्यात आल्या होत्या. संपूर्ण बाजारपेठेत वेगळाच उत्साह भरला होता .सेंटपीटर हायस्कूलच्या कर्मचाऱ्यांकडून अल्पोपहार व ज्यूसची सोय करण्यात आली होती. तर बिटा सेंच्युरी पाचगणी यांच्या तर्फे सर्वांना सकाळी नाष्टा व सायंकाळी जेवणाची सोय करण्यात आली होती.