विशाल शिंदे

नसरापूर : भोर तालुक्यात शासनाच्या मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया योजनेत लाभार्थी महिलांकडून पैशांची मागणी झाल्याच्या आरोपांमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली असून अनेक लाभार्थी महिलांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. चौकशी अहवालाच्या आधारे पुढील दोन ते तीन दिवसांत संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट यांनी दिली.

भोर तालुक्यातील भुतोंडे, लव्हेरी व नसरापूर आरोग्य केंद्रांतर्गत गावांतील ४१ महिलांसाठी ५ जून रोजी नसरापूर येथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आशा सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत शासनाची मोफत योजना असल्याचे सांगून महिलांना शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर नसरापूर येथील खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रिया पार पडल्या.
मात्र शस्त्रक्रियेनंतर काही महिलांकडून एक ते तीन हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. विशेषतः सिझेरियन झालेल्या महिलांना संबंधित डॉक्टरांना पैसे द्यावे लागतील, असे सांगून रक्कम वसूल केल्याचा दावा करण्यात आला आहे. काही महिलांनी भूल पूर्णपणे न चढताच शस्त्रक्रिया करण्यात आल्याने मोठ्या वेदना सहन कराव्या लागल्याचाही आरोप केला आहे.
या संपूर्ण प्रकरणी करंदी खुर्द येथील पप्पू राजीवडे यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करून शिबिराची व संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर प्रशासनाने चौकशी समिती नेमून लाभार्थी महिला, आरोग्य कर्मचारी व संबंधित कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे.
गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट यांनी सांगितले की, “या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून अनेक महिलांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. चौकशी प्रक्रियेतील सर्व बाबींची पडताळणी केली जात असून पुढील दोन ते तीन दिवसांत अहवालाच्या आधारे दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.”
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय तिडके यांनीही तक्रारी प्राप्त झाल्याची पुष्टी करत संबंधित लाभार्थींचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले आहे. चौकशीत जे निष्पन्न होईल त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भोर उपजिल्हा रुग्णालयासह नेरे, भोंगवली, भुतोंडे, लव्हेरी आणि हिर्डोशी येथील शासकीय आरोग्य केंद्रे उपलब्ध असताना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांसाठी महिलांना नसरापूर येथील खासगी रुग्णालयातच का पाठविण्यात आले, याबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणाच्या चौकशी अहवालाकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.







