अक्षय टेमगिरे

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आठवडे बाजारात वाढत्या मोबाईल व रोख रकमेच्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच त्यांनी कोरेगाव भीमा येथील आठवडे बाजारात प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी व्यापारी व नागरिकांशी संवाद साधून पोलिसांच्या कडक उपाययोजनांचा संदेश दिला.
कोरेगाव भीमा येथील गजबजलेल्या आठवडे बाजारात स्पीकरच्या माध्यमातून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देताना पोलीस निरीक्षक यादव म्हणाले की, परिसरातील आठवडे बाजारांमध्ये चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यापुढे कोरेगाव भीमासह शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे व शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील बाजारांमध्ये पोलिसांकडून अधिक कडक उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.
साध्या वेशातील पथकांची नजर
बाजारातील गर्दीचा गैरफायदा घेणाऱ्या चोरट्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून साध्या वेशातील विशेष पथके तैनात करण्यात येणार असून, दिवसभर गस्त घालून संशयितांवर लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच, बाजारातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक पंडित मांजरे यांच्यासह पोलीस कर्मचारी श्रावण गुपचे, संदीप कारंडे, गणेश कुदळे, विकास सरोदे, अमोल दांडगे, अजित इंगवले, विकास बांगर, उमेश जायपत्रे, प्रतीक गायकवाड व विकास कारखिले यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. दरम्यान, ग्रामपंचायत सरपंच अनिकेत गव्हाणे यांनी बाजारातील वाहतूक नियमन व सुरक्षेसाठी ग्रामपंचायतीकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
व्यापाऱ्यांचाही पोलिसांना पाठिंबा
बाजारातील व्यापारी प्रमिला सोनारे यांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत करताना सांगितले की, “आजपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने व्यापाऱ्यांशी असा थेट संवाद साधला नव्हता. महिला चोरट्यांमुळे व्यापाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतो. अशा चोरट्या महिलांना ओळखून आम्ही पोलिसांच्या ताब्यात देऊ.”
नव्या पोलीस निरीक्षकांच्या या धडाकेबाज उपक्रमामुळे बाजारातील चोऱ्यांवर आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.







