अक्षय टेमगिरे

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील पारोडी हद्दीतील एनएच ५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर तासनतास आणि अनेकदा दिवसेंदिवस बंद राहत असल्याने पारोडी व पंचक्रोशीतील नागरिक अक्षरशः संतप्त झाले आहेत.

विशेष म्हणजे, हा टॉवर बहुतांश वेळा रात्री नागरिक झोपल्यानंतर बंद केला जातो आणि सकाळी पुन्हा सुरू केला जातो, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामागे नेमके कोणते ‘षड्यंत्र’ सुरू आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
मोबाईल नेटवर्क कोलमडल्यामुळे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधणे अशक्य होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. याच टॉवरच्या शेजारी मागील वर्षी एका शेतकऱ्याच्या डाळिंबाच्या ४७ गोण्या चोरी करण्याचा प्रयत्न रात्री झाला होता. मात्र, शेतकऱ्याच्या प्रसंगावधानामुळे मोठे नुकसान टळले; परंतु त्या वेळी परिसरात नेटवर्क नसल्याने इतर ग्रामस्थ किंवा पोलिसांशी तात्काळ संपर्क साधणे शक्य झाले नव्हते, ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
ग्रामस्थांच्या मते, टॉवर वारंवार बंद राहत असल्यामुळे चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढण्याची भीती निर्माण झाली असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या समस्येबाबत अनेक वेळा जिओ कस्टमर केअरकडे तक्रारी करूनही संबंधित अधिकारी कोणताही ठोस प्रतिसाद देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अनेक वृत्तपत्रांतून बातम्या प्रसिद्ध होऊनही कंपनी प्रशासनाने अद्याप ठोस पाऊल उचलले नसल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे.
आठ ते दहा दिवसांत कायमस्वरूपी तोडगा निघाला नाही, तर रस्ता रोको आंदोलनासह जिओ टॉवरवर चढून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पारोडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कोकरे, रविराज टेमगिरे, रजनी अविनाश टेमगिरे व इतर ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान, जिओ कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून पारोडी व पंचक्रोशीतील नागरिकांना न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.






