बारामती: बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूक प्रचाराला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाषणाने रंग चढला. प्रचारसभेत त्यांनी मतदारांसमोर थेट भूमिका मांडत, “मी साधू-संत नाही; तुम्ही मला मत द्या, कामे करून देतो,” असे स्पष्ट विधान केले. (Ajit Pawar latest news)
नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले, परंतु ते शक्य न झाल्याची खंतही पवारांनी व्यक्त केली. “माझे सर्व 18 उमेदवार निवडून द्या, दिलेली प्रत्येक हमी पूर्ण करीन. पण तुम्ही काट मारली, तर मीही काट मारेन,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना आणि मतदारांना भावनिक आवाहन केले.

माझ्याकडे 1,400 कोटींचे…; Ajit Pawar
अर्थमंत्री म्हणून मतदारसंघासाठी निधी आणण्याची क्षमता अधोरेखित करताना ते म्हणाले, “माझ्याकडे 1,400 कोटींचे बजेट आहे, त्यातून निधी मिळेल. बारामतीसाठी बाहेरून हजारो कोटी आणले आहेत. अर्थखाते माझ्याकडे आहे.
यावेळी मागील निवडणुकांतील वाद विसरून नव्याने सुरुवात करण्याचे आवाहनही त्यांनी केले. “जे झाले ते गंगेला मिळालं. नवा दिवस सुरू झाला आहे. कुणीही संपत नाही; संकुचित विचार सोडा, मन मोठे ठेवा,” असा सल्ला त्यांनी दिला.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा उल्लेख करत, कारखान्याचे कोट्यवधी रुपये वाचवण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपच्या तावरे गटामधील स्थानिक आघाडीमुळे काही कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यांनी पवारांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून अर्ज दाखल केल्याने, परिस्थिती निवळण्यासाठी पवारांनी माळेगावात सभा घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला.







