बारामती : बारामती दौऱ्यावर (Ajit Pawar) असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Baramati Politics) यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्ता (Baramati Election) मेळाव्यात एक किस्सा सांगत संपूर्ण सभागृहात हास्यकल्लोळ निर्माण केला. राजकीय भाषणांमध्ये नेहमीच थेट आणि मिश्किल शैलीसाठी ओळखले जाणारे अजित पवार यावेळीही आपल्या खास अंदाजात बोलताना कार्यकर्त्यांना हसवण्यात यशस्वी ठरले. (Latest Marathi News)

बारामती दौऱ्यावर आले की अनेक नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी भेटायला येतात, निवेदने देतात, तक्रारी मांडतात, असं सांगत अजित पवारांनी एका महिलेची गोष्ट सांगितली. ही महिला त्यांना भेटायला आली होती आणि तिने आपल्या पतीबाबत तक्रार केली होती. तिच्या पतीला शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आलं असून, तो चुकीच्या पद्धतीने निलंबित झाल्याचा दावा तिने केला होता.
या तक्रारीवर अजित पवार यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी केली. तेव्हा समोर आलं की त्या अधिकाऱ्याने तब्बल 78 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केला असून त्याच कारणामुळे त्याला निलंबित करण्यात आलं आहे. हे सांगताना अजित पवारांनी सहजपणे “फक्त 78 लाखांचा भ्रष्टाचार” असा शब्दप्रयोग केला.
हा शब्दप्रयोग ऐकताच संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला. कार्यकर्ते आणि पदाधिकारी हसत म्हणू लागले, “फक्त 78 लाख!” यावर अजित पवारही हसत म्हणाले, “बरोबर आहे. आपल्याला बारामतीत कोटींमध्ये आकडे ऐकायची सवय झाली आहे. अमुक रस्ता 15 कोटी, अमुक रस्ता 20 कोटी, त्यामुळे 78 लाख सांगताना ‘फक्त’ हा शब्द आपोआप आला.”
त्यांच्या या स्पष्टवक्तेपणावर आणि मिश्किल शैलीवर पुन्हा एकदा सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
हा किस्सा केवळ विनोदापुरता मर्यादित नसून, शासकीय यंत्रणेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या गंभीर वास्तवाकडेही लक्ष वेधणारा ठरतो. लाखोंच्या भ्रष्टाचारालाही ‘लहान’ समजण्याची मानसिकता किती खोलवर रुजली आहे, हे या प्रसंगातून स्पष्ट होते. त्यामुळे हा प्रसंग हसवणारा असला, तरी तो विचार करायला लावणारा देखील आहे.






