Pune Police: पिंपरी-चिंचवड ता. 15 : निवडणूक (PCMC Election 2026) काळात कर्तव्यावर गैरहजर राहिल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. बुधवारी 14 जानेवारी रोजी रात्री उशिरा पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी या निलंबनाचे आदेश जारी केले. या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अशा महत्त्वाच्या काळात काही कर्मचारी कर्तव्यावर अनुपस्थित राहिल्याचे निदर्शनास आले. निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये संजय केळकर, सागर बाविस्कर, जगन्नाथ शिंदे, प्रतिभा गावडे आणि संतोष जाधव यांचा समावेश आहे. हे सर्व कर्मचारी निगडी येथील पिंपरी-चिंचवड पोलिस मुख्यालयात कार्यरत होते.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यापूर्वी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील तळेगाव, आळंदी आणि चाकण नगरपरिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. सलग निवडणुकांमुळे पोलिस विभागावर मोठा ताण होता आणि प्रत्येक कर्मचाऱ्याची उपस्थिती महत्त्वाची ठरली होती.
सध्या पीसीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रमुख नेते शहरात दाखल झाले होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित असताना, उपलब्ध मनुष्यबळावरच सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत होत्या.
निलंबित करण्यात आलेले पाचही कर्मचारी काही महिन्यांपूर्वी रजेवर गेले होते. त्यानंतर पोलिस मुख्यालय आणि आयुक्तालयाकडून त्यांना कर्तव्यावर हजर राहण्याबाबत वारंवार पत्रे आणि सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांनी या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर शिस्तभंगाची कडक कारवाई करत पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पाचही कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे. आदेशात नमूद करण्यात आले आहे की, कर्तव्यावर गैरहजर राहिल्याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरूच राहणार आहे.






