अक्षय टेमगिरे
शिरूर, ता. 25 : शिरूर शहरातील निर्माण प्लाझा परिसर गुरुवारी एका थरारक आणि हृदयस्पर्शी घटनेचा साक्षीदार ठरला. प्रसूती कळांनी विव्हळलेल्या एका गरीब महिलेला अक्षरशः रस्त्यावरच बाळंतपण करावे लागले; मात्र काही क्षणांतच स्थानिक महिला, डॉक्टर, नगरसेविका, पत्रकार आणि नागरिक धावून आल्याने एका गोंडस बाळाचा सुरक्षित जन्म झाला. या प्रसंगाने ‘माणुसकी अजून जिवंत आहे’ हे पुन्हा एकदा सिद्ध केले. Good News

मिळालेल्या माहितीनुसार, जोशीवाडी परिसरातील ही गर्भवती महिला प्रसूती कळा सुरू झाल्याने शिरूर ग्रामीण रुग्णालयाकडे पायी निघाली होती. मात्र निर्माण प्लाझा येथे पोहोचताच तिच्या वेदना तीव्र झाल्या आणि ती रस्त्यावरच बसली. काही क्षणांतच प्रसंग गंभीर बनला. महिलांच्या लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पुढाकार घेतला. कुणी साड्या आणल्या, कुणी स्कार्फ काढले, तर कुणी गर्दी नियंत्रित करून त्या महिलेला सुरक्षित जागा तयार करून दिली. Good News
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच नगरसेविका डॉ. सुनिता पोटे आणि पूजा पोटावळे घटनास्थळी धावून आल्या. डॉ. पोटे यांनी कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसतानाही प्रसंगावधान राखत अत्यंत धाडसाने आणि कौशल्याने प्रसूतीची जबाबदारी सांभाळली. काही क्षणांसाठी सर्वांचे श्वास रोखले गेले होते. बाळाचा जन्म झाला, मात्र ते सुरुवातीला रडत नव्हते. त्या वेळी डॉ. पोटे यांनी त्यांच्या अनुभवाच्या जोरावर योग्य तंत्र वापरून बाळाला रडवले आणि सर्वांच्या जीवात जीव आला. Good News
क्षणभरापूर्वी भीतीने थरथरणाऱ्या वातावरणात अचानक आनंदाची लहर पसरली. बाळाचा चेहरा पाहताच उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करत जल्लोष केला. “निर्माण प्लाझावर ‘निर्माण’चा जन्म झाला!” अशा भावना व्यक्त करत अनेकांनी या प्रसंगाचे कौतुक केले. Good News
या संपूर्ण घटनेत रिक्षाचालक, मेडिकल दुकानदार, स्थानिक महिला आणि पत्रकार यांनीही मोलाची मदत केली. बाळ आणि आईला तातडीने मिरा नर्सिंग होम येथे हलवण्यात आले असून दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. सुनिता पोटे यांनी दिली.
या घटनेने समाजातील एक वेगळेच चित्र समोर आणले. जात, धर्म, ओळख यांचा कोणताही विचार न करता एका अनोळखी महिलेच्या मदतीला सर्वजण धावून आले. अडचणीच्या क्षणी माणूस म्हणून उभे राहणे हीच खरी मानवता असल्याचे या प्रसंगातून अधोरेखित झाले.
दरम्यान, रस्त्यावर घडलेला हा प्रसंग काही क्षणांसाठी भयावह असला, तरी त्यातून उमटलेली माणुसकी, सहकार्याची भावना आणि डॉक्टरांचे धाडस यामुळे तो एक प्रेरणादायी अनुभव ठरला. शिरूरमध्ये घडलेली ही घटना केवळ एक बातमी नाही, तर समाजातील जिवंत असलेल्या संवेदनशीलतेचे जिवंत उदाहरण ठरली आहे. Good News






