अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई येथे साठवण तलावात बुडून तीन लहान मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दुपारी सुमारे 3 ते 4 वाजण्याच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. 8 ते 12 वर्षे वयोगटातील ही मुले तलावात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीस आणि बचाव पथकही तातडीने दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने एक मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे, तर उर्वरित दोन मुलांचा शोध अद्याप सुरू आहे. शोधमोहीम सुरू असून तलाव परिसरात मोठी गर्दी झाली आहे.

या घटनेमुळे सोनई गावासह परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेषतः अशा साठवण तलावांभोवती सुरक्षेची उपाययोजना आणि देखरेख नसल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, तलाव परिसरात सुरक्षेचे नियम कडक करण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.







