लोणी काळभोर, ता. 2 : वयाच्या पन्नाशीनंतर अनेकजण शारीरिक कसरतींपासून दूर राहणे पसंत करतात. मात्र, वय हा केवळ आकडा असल्याचे सिद्ध करत लोणी काळभोर (ता. हवेली) येथील 55 वर्षीय राजेंद्र परशुराम गायकवाड यांनी आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत दिमाखदार कामगिरी केली आहे. आशियातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ICN नॅचरल गोवा आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत त्यांनी दोन सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले. मेन्स क्लासिक फिजीक आणि मेन्स फिजीक या दोन्ही प्रकारांत सुवर्णपदक पटकावत त्यांनी लोणी काळभोरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

विशेष म्हणजे, एकेकाळी 97 किलो वजन, सततची डोकेदुखी, बीपी आणि शुगरचा त्रास अशा आरोग्यविषयक समस्यांनी ते त्रस्त होते. वेदनाशामक गोळ्यांवर अवलंबून राहण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. मात्र, इच्छाशक्ती आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर त्यांनी स्वतःच्या आयुष्याला नवी दिशा दिली. एका मित्रासोबत लागलेली दोन लाख रुपयांची पैज त्यांच्या आयुष्यातील परिवर्तनाचा महत्त्वाचा टप्पा ठरली.
दोन लाखांची पैज अन् फिटनेसचा प्रवास सुरू!
राजेंद्र गायकवाड यांचा फिटनेसचा प्रवास 2017 मध्ये सुरू झाला. त्यावेळी त्यांचे वजन तब्बल 97 किलो होते. प्रकृतीच्या तक्रारींमुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याच काळात मित्र सचिन तात्या तुपे यांनी त्यांना ट्रेकिंगची ओळख करून दिली. सुरुवातीला आवड म्हणून सुरू केलेल्या ट्रेकिंगमुळे त्यांना व्यायामाची गोडी लागली. त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी नियमित जिमला जाण्यास सुरुवात केली.

दरम्यान, एका मित्राने ‘सिक्स पॅक तयार केलेस तर दोन लाख रुपये देतो,’ अशी पैज लावली. या आव्हानाने गायकवाड यांच्यातील जिद्द जागी झाली. केवळ पैज जिंकण्यासाठी नव्हे, तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांनी व्यायाम, आहार आणि फिटनेसवर लक्ष केंद्रित केले. हळूहळू त्यांच्या शरीरात आणि जीवनशैलीत मोठा बदल घडू लागला.

तीन वेळा अपयश, चौथ्या प्रयत्नात सुवर्णयश!
शरीरयष्टीत बदल घडवल्यानंतर गायकवाड यांनी बॉडी बिल्डिंग स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी त्यांनी तीन वेळा स्पर्धेत सहभाग घेतला; मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. तरीही त्यांनी अपयशाने खचून न जाता प्रत्येक वेळी आपल्या तयारीत सुधारणा केली. सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध आहार आणि कठोर मेहनतीच्या जोरावर त्यांनी स्पर्धेसाठी स्वतःला तयार केले. अखेर ICN नॅचरल गोवा आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत त्यांनी आपली ताकद सिद्ध केली. देश-विदेशातील अनुभवी आणि तगड्या स्पर्धकांशी सामना करताना त्यांनी मेन्स क्लासिक फिजीक आणि मेन्स फिजीक या दोन्ही प्रकारांत सुवर्णपदक पटकावले. वयाच्या ५५व्या वर्षी मिळवलेल्या या यशामुळे त्यांच्या मेहनतीचे चीज झाले आहे.
नैसर्गिक शरीरसौष्ठवाला प्राधान्य देणारी ICN स्पर्धा
ICN ही नैसर्गिक पद्धतीने शरीरसौष्ठव विकसित करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. या स्पर्धांमध्ये खेळाडूंची शरीरयष्टी, स्नायूंची ठेवण, शरीराचा समतोल, पोझिंग आणि स्टेजवरील सादरीकरण अशा विविध निकषांवर मूल्यमापन केले जाते. मेन्स फिजीक, क्लासिक फिजीक, बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस मॉडेल अशा विविध प्रकारांसह ज्येष्ठ खेळाडूंसाठीही स्वतंत्र वयोगट असतात.
दरम्यान, राजेंद्र गायकवाड यांच्या या यशामुळे लोणी काळभोर परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. आरोग्याच्या समस्यांवर मात करून वयाच्या 55 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन सुवर्णपदके मिळवण्याची त्यांची कामगिरी तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. जिद्द, मेहनत आणि सातत्य असेल तर वयाची मर्यादा यशाच्या आड येऊ शकत नाही, हेच त्यांनी आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे.







