पुणे : पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील अनेक वर्षांपासून रखडलेली कामे पूर्ण न केल्याबद्दल यवत ग्रामपंचायतच्या वतीने पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर २ ऑक्टोंबरला रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा पुणे सोलापूर प्राधिकरणाला देण्यात आला होता. यावेळी झालेल्या चर्चेत पुढील एक महिन्यात सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन टोल प्रशासन अधिकारी यांनी दिले असून दोन दिवसांपासून अतिक्रमण काढण्याबाबत कारवाई टोल प्रशासनाने सुरू केली आहे.
पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या यवत गावच्या परिसरातील महामार्ग प्रशासनाच्या बाबतीत अनेक समस्या आहेत. शाळेसमोर असलेल्या भुयारी मार्गात साचणारे पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणे, महामार्ग शेजारील असलेल्या दोन्ही बाजुचे ड्रेनेज साफसफाई करून तुटलेले झाकण दुरुस्त करणे,
एस. टी बस थांबा उभारणे, श्री काळभैरवनाथ मंदिराशेजारील पुलाखाली स्वच्छ्ता करून पाण्याचा प्रवाह सुरुळीत करणे. सेवा रस्त्यावरील वारंवार होणारे खड्डे कायम स्वरूपी दुरुस्ती करणे.
महामार्गावर व सेवा रस्त्यावर दिवे बसविणे, सेवा रस्त्यावरून एसटी बस व पी.एम टी बस येण्या-जाण्यासाठी अडथळा निर्माण होत असलेले अतिक्रमण काढून मार्गिका मोकळी करणे, हायवे वरील दुभाजकाची उंची वाढविणे, यवत मुख्य गावात जाणारा रस्ता व स्टेशन रोड रस्ता राज्य मार्ग सिमेंट कॉक्रीट करणे आदि मागण्या निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आल्या आहेत.
मागण्या पूर्ण न केल्यास दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला होता. याबाबत टोल प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासन यांच्यात झालेल्या चर्चेनुसार पुढील एका महिन्यात महामार्गाबाबत असलेल्या समस्या सोडवण्यात येतील. असे महामार्ग प्रशासनाने सांगितले आहे. गेल्या दोन दिवसांपासून महामार्ग शेजारी असलेल्या ड्रेनेज लाईनची स्वच्छता चालू असून ड्रेनेजवर केलेले अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आठवडे बाजारा दिवशी सेवा रस्त्यावर कोणीही विक्रीसाठी बसू नये, असे आवाहन महामार्ग प्रशासन यांच्याकडून करण्यात आले आहे.