आदित्य बोराटे

इंदापूर: इंदापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषी ठरलेल्या आरोपी हर्षनंदन सोनवणे (रा. शेटफळगडे, ता. इंदापूर, जि. पुणे) याला विविध कलमांअंतर्गत एकूण २० वर्षांची सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एम.मुधोळकर यांनी हा निकाल दिला.

सरकारी पक्षाने सादर केलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध भिगवण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (पूर्वीचे भारतीय दंड विधान) तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीनुसार, आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीला फूस लावून शेतातील उसात नेले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडितेच्या आरडाओरडीनंतर तिची आजी घटनास्थळी आली असता आरोपी तेथून पळून गेला, असा आरोप होता. त्यानंतर पीडितेने आई व आजीला घटना सांगितली आणि त्याआधारे पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली.

या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक शेख यांनी केला. तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्यादरम्यान सरकार पक्षाने १२ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. त्यामध्ये पीडित मुलगी, तिची आई, आजी तसेच इतर साक्षीदारांचे जबाब महत्त्वाचे ठरले. घटनेच्या वेळी पीडितेचे वय १३ वर्षे ४ महिने असल्याचे न्यायालयासमोर नोंदविण्यात आले.
सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. प्रसन्न जोशी यांनी पुरावे व साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे प्रभावी युक्तिवाद केला. न्यायालयाने उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून आरोपीला दोषी ठरविले.
न्यायालयाने आरोपीला POCSO कायद्यातील कलम ४ अंतर्गत २० वर्षांची सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड ठोठावला. तसेच भारतीय दंड विधानातील इतर संबंधित कलमांखाली अनुक्रमे ५ वर्षे व २ वर्षांची सक्तमजुरी तसेच दंडाची शिक्षाही सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावास भोगण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
या खटल्यात सरकार पक्षास भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी निश्चल शितोळे आणि पैरवी अधिकारी पीएसआय गौरव कसपटे यांनी सहकार्य केले.







