शिक्रापूर, (पुणे) : कंपनीतील मुलीशी असलेल्या प्रेमप्रकरणाच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून खून करणाऱ्या आरोपीला शिवाजीनगर सत्र न्यायालयाने जन्मठेप, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. सणसवाडी (ता. शिरूर) ग्रामपंचायत हद्दीतील संचेती मसाले कंपनीच्या गेटसमोर २० ऑगस्ट २०१८ रोजी ही घटना घडली होती.
संतोष संभाजी राठोड (वय २६, रा. सणसवाडी ता. शिरूर, मूळ रा. शिगोंली (तांडा) ता. जि. उस्मानाबाद) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर दामोदर कृष्णा जबल (वय ४०, रा. धारावी, मुंबई) यांच्या हत्येप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणसवाडी येथील इंकाई कंपनीतील असल्याने आरोपी व मृत महिला एकमेकांच्या परिचयाचे होते. १९ ऑगस्ट, २०१८ ला दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कंपनीत कामाला असलेल्या मुलीच्या प्रेमप्रकरणावरून संतोष राठोड व दामोदर जबल यांच्यात भांडणे झाली होती.
दुसऱ्या दिवशी २० तारखेला रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संचेती मसाले कंपनीच्या गेटसमोर संतोष राठोड व दामोदर जबल यांच्यात पुन्हा भांडणे झाली. यामध्ये राठोड याने चाकूने जबल याला जबर मारहाण केली होती. त्याला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
आरोपी संतोष संभाजी राठोड याच्याविरुद्ध शिक्रापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी संतोषला अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याचा निकाल सोमवारी (ता.१) शिवाजीनगर सत्र न्यायालयाचे डी. व्ही. कश्यप यांच्या न्यायालयाने दिला.
दरम्यान, सरकारी पक्षातर्फे अॅड. राजेश कावेडीया, अॅड. प्रमोद बोंबटकर अॅड. डी.जी.पी. यांनी कामकाज पाहिले. न्यायालयाने आरोपी संतोष राठोड याला दोषी ठरवून जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंड, तो न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी शिक्षा ठोठावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विद्याधर निचीत यांनी कामकाज पाहिले. तर समन्स व वॉरंट अंमलदार पोलीस उपनिरीक्षक रज्जाक शेख, पोलीस हवालदार प्रफुल्ल सुतार यांनी कामकाज पहिले.