ओमकार भोरडे

शिक्रापूर: शिक्रापूर येथे सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या 5 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना हुलकावणी देणारे आरोपी 3 दिवसांच्या पाठलागानंतर चाकण येथून अटक करण्यात आली.

8 जुलै 2021 रोजी बेकायदेशीर गुटखा विक्रीसाठी वाहतूक व साठवणूक सुरू असल्याची माहिती मिळाल्याने शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकला होता. या कारवाईत सुमारे 78 लाख रुपयांचा गुटखा व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
या प्रकरणी दि. 9 जुलै 2021 रोजी बापू उर्फ प्रवीण शंकर गवते याच्यासह एकूण 13 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडला त्यावेळी आरोपी बापू उर्फ प्रवीण शंकर गवते, वय 22, रा. गवते वस्ती, चाकण, ता. खेड हा गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनाचा चालक होता.
गुन्हा दाखल होताच आरोपी प्रवीण गवते फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचा अनेकदा शोध घेतला, मात्र तो सतत ठिकाणे बदलून पोलिसांना चकवा देत होता.
दरम्यान, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली. त्यात आरोपी चाकण परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी 3 दिवस सातत्याने पाठलाग करून तांत्रिक माहिती व स्थानिक स्त्रोतांच्या आधारे सापळा रचला. अखेर गवते वस्ती, चाकण येथून त्याला ताब्यात घेण्यात आले.
5 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक झाल्याने गुटखा तस्करीविरोधातील कारवाईला बळ मिळाले आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची सखोल चौकशी सुरू आहे. या गुन्ह्याशी संबंधित आर्थिक व्यवहार व इतर आरोपींचे नेटवर्क तपासले जात आहे.
ही कारवाई: पोलीस अधीक्षक संदीप सिंह के., अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख, सोमनाथ कचरे, पो.अंमलदार गणेश येळवंडे, नवनाथ केंद्रे, मयूर कुंभार यांच्या पथकाने केली.







