उरुळी कांचन, (पुणे) : प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र डाळींब बन येथे आषाढी यात्रा आणि बारस महाप्रसादानिमित्त लाखो भाविकांची उपस्थिती असते. या गर्दीनंतर परिसरात साचणारा कचरा उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपने नवव्या वर्षी विशेष स्वच्छता सेवा अभियान राबवून तब्बल 6 टनांपेक्षा जास्त कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली.

सोमवारी (ता. 27) सकाळी सहा ते ते साडेआठ या अवघ्या अडीच तासांच्या कालावधीत तब्बल 160 स्वयंसेवकांनी एकत्र येत हा उपक्रम राबवला. “आजची ही स्वच्छता सेवा श्री विठ्ठल चरणी अर्पण” या भावनेतून राबवण्यात आलेला हा उपक्रम भक्ती, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीचा अद्वितीय संगम ठरला आहे. या अभियानाला यशस्वी करण्यासाठी परिसरातील विविध सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकत्र येत मोठे सहकार्य केले.

या अभियानात ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप, आदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह ग्रुप, डाळींब ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप, उरुळी कांचन ग्रामपंचायत, श्री विठ्ठल देवस्थान ट्रस्ट, डाळींब ग्रामपंचायत तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कचरा संकलनासाठी आवश्यक वाहनांची उपलब्धता माजी नगरसेवक धीरज घाटे यांच्या माध्यमातून करण्यात आली.
दरम्यान, यात्रा संपल्यानंतर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, थर्मोकोल आणि उरलेल्या अन्नाचा कचरा साचतो, ज्यामुळे दुर्गंधी पसरून साथीचे आजार पसरण्याची शक्यता असते. मात्र, सलग 9 वर्षांपासून ‘उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप’ यात्रेच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी एकत्र येऊन अवघ्या काही तासांत संपूर्ण परिसर पूर्वीसारखा चकाचक करतात. अविरत सुरू असलेले हे अभियान समाजात स्वच्छतेची जनजागृती घडविणारे आणि लोकसहभागातून परिवर्तन घडविणारी प्रभावी चळवळ म्हणून ओळखली जात आहे. भाविक आणि नागरिकांकडून या सर्व ग्रामदूतांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.






