हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : Shindavane Accident उरुळी कांचन जेजुरी मार्गावर शिंदवणे घाटात जेजुरीकडून उरुळी कांचन (ता. हवेली) च्या दिशेने निघालेला दुधाचा टँकर शिंदवणे घाटात पलटी झाल्याची घटना बुधवारी (ता. २२) संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी टँकरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामधील दुध हे रस्त्यावर सांडले असल्याचे दिसून येत आहे. (Shindavane Accident)
अपघात सत्र थांबता थांबेना
मिळालेल्या माहितीनुसार, सदरचा टँकर हा फलटण (जि. सातारा) या ठिकाणावरून मंचर (ता. खेड) या ठिकाणी निघाला होता. यावेळी शिंदवणे घाटात सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आला असता चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात टँकरचे मोठे नुकसान झाले असून बघ्यांनी रस्त्यावर एकच गर्दी केली आहे.
घाटात अपघाताचे सत्र सुरूच..!
पुणे – सोलापूर महामार्गावरून जेजुरी या ठिकाणी जाण्यासाठी जवळचा रस्ता म्हणून शिंदवणे घाटाकडे पाहिले जाते. या घाटातून दररोज जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांची संख्या हजारो आहे. गुरुवारी (ता. १६) एक मालवाहू ट्रक याच घाटात पलटी झाला होता. तर पाठीमागून येणाऱ्या एका चारचाकी गाडीवर साहित्य पडल्याने चारचाकी गाडीचे नुकसान झाले होते. तसेच शुक्रवारी (ता. १७) आयशर कंपनीचा मोठा टेम्पो याच ठिकाणी पलटी झाला होता.
जड वाहने वळताना वाहनचालकाला अंदाज येत नसल्याने हे अपघात..!
“तीव्र वळणावर वाहनांचा अपघात होऊ नये म्हणून भिंतींचे काम सुरु आहे. मात्र सदर ठिकाणी होत असलेल्या वारंवार अपघाताच्या ठिकाणावरील वळणाचा टप्पा कमी करण्याची गरज निर्माण झाली आहे. सदर ठिकाणी जड वाहने वळताना वाहनचालकाला अंदाज येत नसल्याने हे अपघात होत आहेत.
वाघापूर ते शिंदवणे या मार्गावरील वाहतूक बंद..!
पीएन-२९ अंतर्गत तळेगाव ढमढेरे ते जेजुरी राष्ट्रीय मार्ग क्रमांक ११७ या रस्त्याचे मजबुतीकरण तसेच शिंदवणे घाटमाथा येथील पुलाचे काम सुरु असल्याने २४ मार्च ते २९ एप्रिल २०२३ या कालावधीत वाघापूर ते शिंदवणे मार्गावरील वाहतूक बंद करुन ती सासवड- पिसर्वे-टेकवडी-बोरीऐंदी आणि सासवड-वाघापूर चौफुला-माळशिरस-यवत या मार्गे वळविण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
दरम्यान, नागरिकांनी वाघापूर ते शिंदवणे मार्गावरील वाहतूक कोंडी तसेच संभाव्य अपघात टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.