अक्षय टेमगिरे

शिक्रापूर : इंस्टाग्रामवरून ओळख झालेल्या तरुणीने भेटण्यासाठी बोलावल्यानंतर तरुणाला पकडून त्याचा मोबाईल पैसे व एटीएम काढून घेत त्याला एसटी बसस्थानकात नेऊन ५० हजार रुपये दे अन्यथा मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात देऊ तसेच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिल्याचा प्रकार शिक्रापूर येथे समोर आला आहे.

शिक्रापूर पोलिसांच्या रात्रीच्या पेट्रोलिंगदरम्यान हा प्रकार उघडकीस आला असून.

या प्रकरणी सुरज चंद्रकांत वारे वय २३, रा. सिंग पीजी वडगावशेरी पुणे मूळ रा. रत्नापूर, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सुरज वारे यांच्या फिर्यादीनुसार २३ ऑगस्ट रोजी रात्री १० ते २४ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान शिक्रापूर येथील चाकण चौक व एसटी बसस्थानक परिसरात हा प्रकार घडला असून.
इंस्टाग्रामवरून शितल डाके व वैष्णवी गायकवाड यांच्याशी ओळख झाल्यानंतर शितल हिने फिर्यादीशी व्हॉइस कॉल व मेसेजद्वारे संपर्क साधून वेळोवेळी ऑनलाइन पैशांची मागणी केली. तसेच तुला जे हवे ते देईल असे सांगून फिर्यादीला चाकण चौकात भेटण्यासाठी बोलावले
फिर्यादी तेथे आल्यानंतर शितल डाके, वैष्णवी गायकवाड व आकाश गायकवाड यांनी त्याला पकडून त्याच्या खिशातील मोबाईल, पैसे व एटीएम काढून घेतले त्यानंतर त्याला एसटी बसस्थानकात नेऊन पकडून ठेवले आणि ५० हजार रुपये दे, अन्यथा मारहाण करू व पोलिसांच्या ताब्यात देऊ तसेच तुझ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली .
या प्रकरणी शितल संजय डाके, वैष्णवी आकाश गायकवाड, आकाश चिंतामण गायकवाड आणि शुभम कांडगे पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही यांच्याविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवा. श्रावण गुपचे व योगेश आव्हाड हे रात्रीच्या गस्तीवर असताना सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांना पोलीस ठाण्यात आणून कायदेशीर कारवाई केली आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार काळे हे करीत आहेत.







