मुंबई: मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी परिसरात अनैतिक संबंधांच्या संशयातून रिक्षाचालकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीशी शारीरिक संबंध असल्याचा संशय आल्याने ५० वर्षीय व्यक्तीने आपल्या मुलाच्या मदतीने ३२ वर्षीय रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जखमी तरुणाने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली असून, मालवणी पोलिसांनी बाप-लेकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

मालवणी परिसरात राहणाऱ्या कालिदास याला रिक्षाचालक गणेश सक्सेना याच्यावर संशय होता. गणेशचे आपल्या पत्नीशी संबंध असल्याचा संशय असल्याने कालिदास आणि त्याचा मुलगा योगेश यांनी गणेशला गाठून त्याच्याकडे जाब विचारला. यावेळी तिघांमध्ये जोरदार वाद झाला.

वाद वाढल्यानंतर परिस्थिती चिघळली आणि दोन्ही बाजूंमध्ये झटापट झाली. याचदरम्यान योगेशने गणेशचे कपडे काढल्याचा आरोप आहे. त्यानंतर कालिदासने धारदार ब्लेडने त्याच्या गुप्तांगावर सपासप वार करत हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात गणेश जखमी झाला.

घटनेनंतर गणेशने तेथून कसाबसा निसटत रुग्णालय गाठले. तेथे उपचार घेतल्यानंतर त्याने मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेत संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कालिदास आणि योगेश या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मालवणी पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, हल्ल्यामागील नेमकी परिस्थिती आणि वादाचे कारण याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे. अनैतिक संबंधांच्या केवळ संशयातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.







