लोणी काळभोर: पुणे शहरातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या सायबर तपास पथकाने दोन वेगवेगळ्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये नागरिकांची तब्बल २ लाख ७८ हजार ४०० रुपयांची रक्कम परत मिळवून दिली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे आर्थिक फसवणुकीचा फटका बसलेल्या दोन्ही नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पहिल्या प्रकरणात ७४ वर्षीय रमेश चंद्रा उपाध्याय यांच्या व्हॉट्सॲपवर अनधिकृतपणे APK फाईल पाठवण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या खात्यातून १८ हजार ४०० रुपयांचा व्यवहार करण्यात आला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ऑनलाइन सायबर तक्रार दाखल केली.

दुसऱ्या प्रकरणात रंजन यादव हे १६ डिसेंबर २०२५ रोजी Google Payच्या माध्यमातून आपल्या भावाला पैसे पाठवत होते. मात्र, व्यवहारादरम्यान तब्बल २ लाख ६० हजार रुपये अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर ट्रान्सफर झाले. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच यादव यांनी महाराष्ट्र सायबर हेल्पलाईन १९३० वर तक्रार नोंदवली.

तक्रारी मिळाल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांच्या सायबर पथकाने संबंधित बँका आणि मर्चंट यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार करून फसवणुकीची रक्कम परत मिळवण्यासाठी पाठपुरावा केला. पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले असून दोन्ही प्रकरणांतील एकूण २ लाख ७८ हजार ४०० रुपये संबंधित अर्जदारांना परत मिळवून देण्यात आले.
रक्कम परत मिळाल्यानंतर रंजन यादव यांनी पोलिसांचे आभार मानले. ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास नागरिकांनी वेळ न दवडता १९३० या महाराष्ट्र सायबर हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) नंदकुमार कोळी, महिला पोलीस अंमलदार उषा थोरात, पोलीस अंमलदार योगेश पाटील आणि महिला पोलीस अंमलदार कौशल्या शिंदे यांच्या सायबर तपास पथकाने केली.







