नेपाळ : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या अचानक आणि भीषण पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पुराच्या प्रचंड वेगामुळे स्थानिक जनजीवन पूर्णपणे कोलमडले असून तेथे फिरण्यासाठी गेलेले भारतीय व आंतरराष्ट्रीय पर्यटक अडकले आहेत. या नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना वेळेत मदत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तात्काळ पावले उचलली आहेत.

महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (मंत्रालय, मुंबई) अडकलेल्या पर्यटकांची सर्व माहिती एकत्र करण्यासाठी एक विशेष ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे.🔗 माहिती नोंदणीसाठी अधिकृत पोर्टल:geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/☎️ आणीबाणी संपर्क क्रमांक (टोल फ्री): 1077

नेपाळमध्ये प्रवास करणारे नागरिक किंवा पर्यटक पूरग्रस्त भागात अडकले असल्यास, त्यांच्या नातेवाईकांनी घाबरून न जाता वरील लिंकवर जाऊन योग्य माहिती नोंदवावी. माहिती भरताना खालील तपशील देणे अत्यंत आवश्यक आहे.अडकलेल्या व्यक्तीचे पूर्ण नाव,चालू मोबाईल क्रमांक,नेपाळमधील सध्याचे ठिकाण किंवा हॉटेलचा पत्ता, प्रवासाचा संपूर्ण तपशील कुटुंबातील इतर सदस्यांचा संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे.

नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आणि योग्य ती मदत तात्काळ पुरवण्यासाठी राज्य शासन संपूर्ण यंत्रणेसह कार्यरत आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शासकीय हेल्पलाईनशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.







