राहुलकुमार अवचट

यवत : दौंड तालुक्यातील यवत येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध होत नसल्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गावातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ आणि २ मध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या मोठी असतानाही शुद्ध पाण्याची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना पाण्यासाठी शाळेच्या परिसरात भटकंती करावी लागत आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या यवत गावातील या दोन्ही शाळांमध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, शाळेत पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध नसल्याने काही विद्यार्थी पाण्याच्या रिकाम्या बाटल्या घेऊन आसपासच्या परिसरात पाणी शोधताना दिसतात. काही विद्यार्थी घरूनच पाण्याच्या बाटल्या भरून आणतात. त्यामुळे दप्तराच्या ओझ्याबरोबरच पाण्याच्या बाटल्यांचे वजनही विद्यार्थ्यांना वाहावे लागत आहे.

समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना शाळेत माध्यान्ह भोजन दिले जाते. मात्र, भोजनानंतर पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. पाणी भरण्यासाठी शाळेबाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेच्या आजूबाजूला असलेले भटके श्वान विद्यार्थ्यांचा पाठलाग करत असल्याने काही विद्यार्थ्यांना दुखापत होण्याचीही शक्यता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शाळेत शुद्ध पाणी उपलब्ध नसल्याने विद्यार्थी कोणत्या ठिकाणचे पाणी पितात, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अशुद्ध पाणी प्यायल्यास विद्यार्थ्यांना विविध आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे शाळांमध्ये सुरक्षित आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे.
यवत येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजेकडे लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांना लवकरात लवकर शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच पाणीपुरवठ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी पालक आणि ग्रामस्थांकडून होत आहे.






