थेऊर, ता. 27 : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र थेऊरच्या धार्मिक आणि ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणाऱ्या महर्षी कौंडिण्यऋषी (कपिल ऋषी) आश्रम परिसरात ग्रामस्थ आणि गणेशभक्तांच्या पुढाकारातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. काळाच्या ओघात दुर्लक्षित झालेल्या या पवित्र स्थळाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढल्याने भाविकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून परिसर स्वच्छ केला.

श्रीक्षेत्र थेऊरला पुराणपरंपरेत महत्त्वाचे स्थान असून, येथील श्री चिंतामणी गणपती मंदिरामुळे या गावाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. थेऊरला ‘दक्षिण काशी’ म्हणूनही संबोधले जाते. या पवित्र भूमीतील महर्षी कौंडिण्यऋषी आश्रम हे महत्त्वाचे आध्यात्मिक स्थान मानले जाते. या आश्रमाच्या माध्यमातून थेऊरच्या प्राचीन धार्मिक परंपरेची आणि सांस्कृतिक वारशाची ओळख होते.
स्वच्छता अभियानामुळे आश्रमाकडे जाणारा मार्ग अधिक मोकळा आणि सुकर झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दिलासा मिळणार आहे. श्रमदानात सहभागी झालेल्या गणेशभक्तांनी परिसर स्वच्छ ठेवण्यासोबतच या प्राचीन स्थळाचे महत्त्व अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली.

श्रीक्षेत्र थेऊरमध्ये अनेक प्राचीन धार्मिक स्थळे असल्याचे सांगितले जाते. मात्र, योग्य देखभाल आणि संवर्धनाअभावी काही स्थळे दुर्लक्षित राहत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे केवळ स्वच्छता अभियान राबवून न थांबता आश्रम परिसराची नियमित स्वच्छता, आवश्यक दुरुस्ती आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न होणे गरजेचे आहे.

दरम्यान, थेऊरमधील युवा गणेशभक्तांनी स्वयंस्फूर्तीने सुरू केलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे. आश्रमाचे धार्मिक महत्त्व व्यापक स्तरावर पोहोचावे आणि थेऊरमधील प्राचीन धार्मिक स्थळांचे पुनरुज्जीवन व्हावे, अशी अपेक्षा गणेशभक्त आणि ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.






