पुणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग सुरू असताना बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांनी उधळून लावला आहे. पाचशे रुपयांच्या हुबेहूब बनावट नोटा तयार करून त्या बाजारात खपवण्याच्या तयारीत असलेल्या आंतरजिल्हा टोळीचा विश्रामबाग पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी चार जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण १ हजार १२८ बनावट नोटा आणि नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील चारही आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. शाफाज फिरोज अन्सारी हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप आहे. यापूर्वीही बनावट नोटा तयार करण्याच्या प्रकरणात तो पोलिसांच्या ताब्यात आला होता. दिवाळीच्या काळात बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होत असल्याने या गर्दीचा फायदा घेऊन बनावट नोटा चलनात आणण्याचा आरोपींचा प्रयत्न होता.
बनावट नोटा तयार करण्यासाठी आरोपींनी आधी खरी नोट स्कॅन केली. त्यानंतर नोटेचा रंग, आकार, फॉन्ट आणि डिझाइनचा अभ्यास करून संगणकीय सॉफ्टवेअरच्या मदतीने पाचशे रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्याचे तपासात समोर आले आहे.

महात्मा फुले मंडई परिसरात एक व्यक्ती बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अंमलदार सचिन अहिवळे आणि शैलेश सुर्वे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मंडईमागील रस्त्यावर सापळा रचला. यावेळी सलमान राजे याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे पाचशे रुपयांच्या ८०५ बनावट नोटा आढळल्या.

सलमान राजे याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली. सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने पथके रवाना करण्यात आली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने विशाल गलांडे आणि अभिजित कांबळे यांना शिरोळ येथून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून प्रिंटर, मॉनिटर, सीपीयू, की-बोर्ड आणि माऊस असे सुमारे २१ हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.
दरम्यान, मुख्य सूत्रधार शाफाज अन्सारी याच्या घरातून पाचशे रुपयांच्या आणखी ३२३ बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. या कारवाईत एकूण १ हजार १२८ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या टोळीचे जाळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ आणि नालासोपारा परिसरापर्यंत पसरल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.






