पुणे, ता. 27 : ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या पैशांवरून तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याच्या आरोपाखाली दाखल गुन्ह्यातील आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. संदीप निवृत्ती गावंडे (रा. गंजपेठ, पुणे) असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यू. वाडगावकर यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा आदेश दिला अशी माहिती आरोपीचे वकील ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांनी दिली.

फिर्यादी संदीप मेंगडे यांच्या तक्रारीनुसार, कमिशनवर बँक व्यवहार करण्याच्या कारणावरून काही व्यक्तींशी त्यांचा संपर्क आला होता. या व्यवहारादरम्यान ऑनलाइन फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर पैसे परत करण्यावरून वाद निर्माण झाला. त्यातून फिर्यादीला आणि त्याच्या कुटुंबीयांना धमक्या दिल्याचा आरोप आहे.
7 सप्टेंबर 2026 रोजी रात्री पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील साई पेट्रोलपंपाजवळ फिर्यादीला भेटण्यासाठी बोलावण्यात आले. तेथे गौरव कांबळे, समीर मेहता, रियान रफिक शेख आणि संदीप गावंडे यांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवून गंजपेठ आणि पिंपळे गुरव परिसरात नेण्यात आले. यावेळी त्याच्याकडील मोबाइल, चांदीची साखळी आणि पाकीट काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच लोखंडी कोयत्याने हातावर वार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.

दरम्यान, 8 सप्टेंबर रोजी पहाटे पिंपळे निलख येथील रक्षक चौकाजवळ पोलिसांचे गस्ती पथक जात असताना फिर्यादीने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून संबंधितांना सांगवी पोलिस ठाण्यात नेले. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद
आरोपी संदीप गावंडे याच्या वतीने ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांनी जामीन अर्ज दाखल करून युक्तिवाद केला. सरकारी पक्षाने जामीन देण्यास विरोध केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून आणि प्रकरणातील उपलब्ध बाबींचा विचार करून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यू. वाडगावकर यांनी आरोपीला जामीन मंजूर करण्याचा आदेश दिला. या प्रकरणात ॲड. स्वप्नील दाभाडे आणि ॲड. ऋषिकेश पाटील यांनी सहकार्य केले.






