पुणे : कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रब्बी हंगामात ज्वारीच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण उप अभियानाअंतर्गत 15,860 बियाणे मिनीकिट वाटपाचे उद्दिष्ट मंजूर करण्यात आले आहे. या योजनेचा थेट फायदा पुण्यातील हजारो शेतकरी बांधवांना होणार आहे.

पावसामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी कृषी विभागाने रब्बी ज्वारी लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण उप अभियानांतर्गत जिल्ह्यातील 15 हजार 860 शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीचे सुधारित बियाणे मिनीकिट मोफत दिले जाणार आहेत. यामुळे दुष्काळसदृश स्थितीतही शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळण्यास आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
केंद्र आणि राज्य सरकारच्या 2026-27 च्या या उपक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी एकूण 634 क्विंटल बियाणांचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला 4 किलो बियाणांचे एक मिनीकिट दिले जाईल. यात परभणी सुपरमोती, फुले यशोमती आणि पीकेव्ही शक्ती यांसारख्या कमी पाण्यात टिकणाऱ्या वाणांचा समावेश आहे. बियाणांसोबत जैविक खत आणि लागवडीचे योग्य मार्गदर्शनही पुरवले जाणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांची निवड ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या नियमानुसार केली जाईल. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी अजिबात वेळ न दवडता पोर्टलवर त्वरित अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

निवड झालेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना 10 नोव्हेंबर 2026 पूर्वी या बियाणे मिनीकिटचे वाटप केले जाईल. कृषी विभागाने शेतकऱ्यांना या सुधारित बियाणांचा योग्य वापर करून वेळेवर पेरणी पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे.






