उरुळी कांचन, (पुणे) : विवाहित गृहिणीला “तुमचे पार्सल आले आहे” असा बनाव रचून फोन करायचा, तिच्याशी अश्लील बोलून एकांतात भेटण्याची मागणी करायची आणि नकार दिल्यावर तिचे व स्वतःचे अश्लील फोटो एडिट करून तिच्याच बहिणीच्या मोबाईलवर पाठवून संसार उद्धवस्त करण्याची धमकी देणाऱ्या नराधमाचा पर्दाफाश झाला आहे.

याप्रकरणी सोरतापवाडी येथील एका 28 वर्षीय विवाहित महिलेने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय गणपत शिंदे (रा. येवलेवाडी, टिकेकरनगर, हवेली, सध्या रा. कळस, पुणे) असे संशयित आरोपीचे नाव असून त्याच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी संबंधित तरुणाने फोन करून महिलेला सोरतापवाडीतील महादेव मंदिराजवळ पार्सल घेण्यासाठी बोलावले. मात्र, आपण कोणतेही पार्सल मागवले नसल्याचे महिलेने सांगितले. त्यावेळी संबंधिताने आपल्याला ती आवडत असल्याचे सांगून एकांतात भेटण्याचा आग्रह धरला. भेटली नाहीस तर तुझा संसार उद्ध्वस्त करीन आणि पतीला जीवे मारीन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणाने महिलेचे आणि स्वतःचे एकत्रित असल्याचे भासवणारे मॉर्फ केलेले अश्लील फोटो तिच्या बहिणीच्या मोबाइलवर पाठविल्याचे तक्रारीत नमूद आहे. रात्री बहिणीने स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर महिलेच्या हा प्रकार लक्षात आला. हे फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले.

दरम्यान, संबंधित तरुण वारंवार फोन करून अश्लील बोलत असून, जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी अक्षय शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस हवालदार शैलेश लोखंडे करीत आहेत.






