बीड : वाल्मिक कराड असलेल्या बीड जिल्हा कारागृहातील कथित गैरप्रकारांच्या आरोपांनंतर तीन उच्चस्तरीय पथकांनी सखोल तपास केला असल्याची माहिती समोर आली आहे .या चौकशीत कारागृहात कोणतीही अनियमितता किंवा मोबाईलचा गैरवापर झाल्याचे आढळले नाही. दरम्यान, सुरक्षेचा उपाय म्हणून कारागृहातील फोन कॉल सुविधा बंद करण्यात आली असून, आता फक्त प्रत्यक्ष भेटी आणि व्हिडिओ संवादाचे पर्याय उपलब्ध ठेवण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वी विलास घुले यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे बीडमधील राजकीय व सामाजिक वातावरण तापले होते. या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केला होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याने जेलमधून मोबाईलवरून संपर्क साधत कट रचल्याचा आणि आपल्या मुलाला यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला होता. या संभाषणाची एक ऑडिओ क्लिपही त्यांनी जाहीर केली होती.
धनंजय देशमुख आणि खासदार सोनवणे यांनी कारागृहात कैद्यांना व्हीआयपी वागणूक मिळत असल्याचा आरोप केला होता. खासदार सोनवणे यांनी या प्रकरणाची तक्रार थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि कारागृह महानिरीक्षकांकडे करून चौकशीची मागणी केली होती.या तक्रारींची दखल घेत वरिष्ठ पातळीवरून तातडीने हालचाली झाल्या.

छत्रपती संभाजीनगर कारागृह अधीक्षकांचे दक्षता पथक, पुण्यातील विशेष पथक आणि महानिरीक्षक कार्यालयाच्या पथकाने बीड कारागृहात जाऊन सखोल पाहणी केली. या पथकांनी सीसीटीव्ही फुटेज, ॲलन कॉल प्रणाली, सुरक्षा व्यवस्था आणि कैद्यांच्या भेटीच्या नोंदींची सूक्ष्म तपासणी केली. विशेषतः वाल्मीक कराडच्या कोठडीजवळील 12 उच्च क्षमतेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासण्यात आले.







