पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात एक अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. मॅनहोल (गटार) स्वच्छ करण्यासाठी खाली उतरलेल्या दोन तरुण कामगारांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अमोल शिंदे (वय 20) आणि मनोज शिंदे (वय 26) हे दोघे कामगार मॅनहोल साफ करण्याचे काम करत होते. मात्र, गटरमधील विषारी वायू आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ते आतच बेशुद्ध झाले. त्यांना वेळेवर बाहेर काढणे शक्य न झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व हळहळ व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, जवळपास एका वर्षापूर्वी याच मॅनहोलमध्ये बीएसएनएलचे काम करत असताना तीन कामगारांचा अशाच प्रकारे गुदमरून मृत्यू झाला होता. वारंवार घडणाऱ्या या गंभीर दुर्घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी व कामगार संघटनांनी कंत्राटदार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका केली आहे.

तसेच सुरक्षिततेची कोणतीही साधने न पुरवता कामगारांना धोक्यात ढकलल्याचा आरोप केला जात आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे.






