आदित्य बोराटे –

इंदापूर : गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगून फिरणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ताब्यात घेतले. ओंकार उर्फ नाना सोमनाथ देशमुख (रा. जंक्शन, ता. इंदापूर) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा सुमारे 30 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना गोपनीय बातमीदारामार्फत नीलमणी मंगल कार्यालयाजवळ एक व्यक्ती गावठी पिस्तूल बाळगून उभी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचून ओंकार देशमुख याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले.

या प्रकरणी पोलिस अमलदार तुषार चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधिताविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यातील कलम 3 व 25 तसेच महाराष्ट्र पोलिस कायद्यातील कलम 37(1)(3) सह 135 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल,अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, सहायक पोलिस फौजदार शिवाजी निकम, पोलिस हवालदार किशोर तेलंग, शैलेश स्वामी, गुलाब पाटील, पोलिस अमलदार गणेश ढेरे,तुषार चव्हाण यांच्या पथकाने केली.







