लोणी काळभोर : लोणी काळभोर परिसरातील बेकायदेशीर मटका जुगाराच्या धंद्याविरुद्ध पोलिसांनी कठोर पाऊल उचलले असून, मटका जुगाराच्या प्रकरणांत सराईत असलेल्या दोघांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली आहे.

रोहन संतोष शुक्ला (वय 30) आणि सागर भगवान ऊफाडे (वय 32) अशी तडीपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. लोणी काळभोर पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सराईत गुन्हेगार आणि अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी मटका जुगारासह विविध अवैध धंद्यांमध्ये सक्रिय असलेल्या आरोपींवर लक्ष केंद्रित केले आहे.

प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही मटका जुगार सुरूच

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन संतोष शुक्ला हा आग्रेवस्ती, लोणी काळभोर येथील रहिवासी असून, सागर भगवान ऊफाडे हा पाषाणकर बागेजवळ राहतो. या दोघांविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही त्यांनी कथितरीत्या बेकायदेशीर मटका जुगाराचे धंदे सुरू ठेवल्याने सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
बेकायदेशीर जुगारामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होऊन अनेक कुटुंबांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी या दोघांविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार हा प्रस्ताव पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ६, पुणे शहर यांच्याकडे पाठविला होता.या प्रस्तावाची दखल घेत पोलीस उपआयुक्त जीवन बेनीवाल यांनी रोहन शुक्ला आणि सागर ऊफाडे या दोघांना दोन वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त जीवन बेनीवाल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नंदकुमार कोळी, पोलीस हवालदार विलास शिंदे, महिला पोलीस हवालदार स्वाती पिसाळ, पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे आणि प्रवीण दडस यांच्या पथकाने केली आहे.







