पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सप्टेंबर महिन्याच्या 1500 रुपयांच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांची चिंता आता दूर होणार आहे. आगामी सण-उत्सवाच्या आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पात्र महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे.

सप्टेंबर महिना संपत आला तरीही खात्यात पैसे आले नसल्याने महिलांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, आता राज्य सरकारने सप्टेंबर महिन्याचा प्रलंबित हप्ता वितरित करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. महिला व बाल विकास विभागामार्फत या रकमेचे वाटप केले जाणार असून, त्याकरिता सरकारने प्रशासकीय मान्यता देऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे.
शासकीय माहितीनुसार, या हप्त्यासाठी एकूण 344.62 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र लाभार्थी महिलांना हा लाभ देण्यासाठी हा निधी अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. सरकारकडून मुख्य सचिवांना निधी वितरीत करण्याचे अधिकार देण्यात आल्यामुळे पुढील काही दिवसांतच थेट महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दिवाळीच्या तोंडावर निधी मंजूर झाल्यामुळे राज्यातील लाखो लाडक्या बहिणींची दिवाळी अधिक आनंदात साजरी होणार आहे. खात्यात रक्कम जमा होण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याने लाभार्थी महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.








