लोणी काळभोर : येथील राहिंज वस्ती परिसरात बुधवारी (ता. 26) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका पिसाळलेल्या कुत्र्याने दहशत माजवत 7 ते 8 जणांना चावून गंभीर जखमी केले. या भयंकर हल्ल्यात एका साडेचार वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याच्या डोक्याला कुत्र्याने जबर चावा घेतल्याने त्याला तब्बल 7 टाके पडले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास राहिंज वस्ती परिसरात अचानक आलेल्या एका पिसाळलेल्या कुत्र्याने समोर येईल त्याच्यावर हल्ला चढवला. घराच्या समोर खेळत असलेल्या अवघ्या साडेचार वर्षांच्या चिमुकल्याच्या थेट डोक्याला कुत्र्याने चावा घेतला. जखमी मुलाला तातडीने लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र जखम तीव्र असल्याने त्याला विश्वराज हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.

त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर त्याच परिसरात खेळत असलेल्या एका 10 वर्षांच्या मुलीच्या पाठीवर आणि कंबरेवर कुत्र्याने चावा घेतला. तिलाही विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिच्यावर प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले आहे. याशिवाय बाळासाहेब कोळपे यांच्या घराजवळ एका मुलीला, परिसरात खेळणाऱ्या दुसऱ्या एका चिमुकलीला आणि एका महिलेलाही या कुत्र्याने चावा घेतला. या घटनेनंतर परिसरातील नागरिक हातात काठ्या घेऊन जमा होताच पिसाळलेले कुत्रे शेताच्या दिशेने पळून गेले. मात्र, रात्री उशिरा या कुत्र्याने गायकवाड वस्ती परिसरात एका पाळीव कुत्र्यावरही हल्ला करून त्याला चावा घेतल्याची माहिती दिली.

एकाच दिवशी अनेक जणांवर झालेल्या या हल्ल्यामुळे राहिंज वस्ती व गायकवाड वस्ती परिसरातील ग्रामस्थ आणि महिलांमध्ये भीतीचे सावट आहे. मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे लहान मुलांना घराबाहेर खेळायला पाठवणे किंवा रात्रीच्या वेळी रस्त्यावरून चालणे अत्यंत धोकादायक बनले आहे. परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली असून, त्यांच्यावर प्रशासनाकडून कोणतीही नसबंदी किंवा पकडण्याची कारवाई केली जात नसल्याने नागरिकांमधून सोयीस्कर दुर्लक्षाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
लोणी काळभोर आणि आसपासच्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पिसाळलेल्या कुत्र्याचा लवकरात लवकर बंदोबस्त केला नाही, तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखाद्या नागरिकाचा किंवा बालकाचा नाहक जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक विचारू लागले आहेत.
याबाबत बोलताना तुषार राहिंज म्हणाले, “परिसरातील ग्रामस्थांनी या पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पळून गेल्याने पिसाळलेले कुत्रे सापडले नाही. परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. धुमाकूळ घालणाऱ्या कुत्र्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना हातात लाठ्या-काठ्या घेऊन बाहेर पडावे लागत आहे.







