सासवड : अभ्यासक्रमाची वही घेऊन न आल्याने सासवड येथील नामांकित शाळेतील शिक्षकाने मुलाला रागात केलेल्या मारहाणीत मुलाच्या कानाचा पडदा फाटल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी (ता. 23) हि घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्षकावर सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश काशिनाथ पाठक, (शिक्षक, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे वाघिरे हायस्कुल सासवड), असे मारहाण केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी मुलाचे वडील ॲड. संतोष बाळासो कचरे (वय 43, रा. ज्योती विहार सोसायटी, सासवड, ता. पुरंदर) यांनी सासवड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पाठक यांच्यावर सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ॲड. संतोष कचरे यांचा मुलगा हा सासवड येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे वाघिरे हायस्कुल या ठिकाणी इयत्ता 5 वीच्या वर्गात शिकत आहे. मंगळवारी रोजच्याप्रमाणे शाळेत गेला होता. शाळा सुटल्यानंतर शाळेतुन घरी आला. त्याने रडत रडत आईला सांगितले की गणिताचे शिक्षक पाठक सरांनी गणिताची वही बेंच वरती काढुन ठेवायला सांगितली. मात्र माझी वही घरी राहीली होती.
पाठक सर वह्या चेक करीत असताना वही नसल्याने त्यांनी मुलाच्या डाव्या कानाखाली चापट मारली. तेव्हापासुन मुलाचा कान दुखत असुन डाव्या कानाने ऐकु येत नसल्याचे सांगितले. त्याच्यावर प्राथमिक उपचारासाठी सासवड येथील ग्रामीण रूग्णालय येथे उपचार केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून कानतज्ञांचा सल्ला घेण्याबाबत माहिती दिली.
दरम्यान, बुधवारी सासवड शहरातील एक कानाचे तज्ञ डॉक्टर यांच्याकडे उपचार घेतले असता त्यांनी सांगतिले की, डाव्या कानाचा पडदा फाटला असुन त्यास गंभीर दुखापत झाली आहे. तसेच कानाचे ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले. याप्रकरणी कचरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सासवड पोलीस ठाण्यात शिक्षक गणेश पाठक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.