सांगली : एका महिलेला मोबाईलवर मेसेज केल्याच्या कारणातून 59 वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथून अपहरण करण्यात आलेल्या गोविंद माधवराव उपासे यांना सांगलीत आणून मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह कडेगाव परिसरातील टेंभू योजनेच्या कॅनॉलमध्ये टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सांगली शहर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत अवघ्या 5 दिवसांत हत्येचा छडा लावला. पोलिसांनी वैभव ऊर्फ तातोबा केंगार, वय 28, रोहन जयसिंग सावंत, वय 23 आणि राहुल राजेंद्र बाबर, वय 25, या तिघांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, 10 ऑगस्ट रोजी गोविंद उपासे यांचे आंबेगाव बुद्रुक येथून अपहरण करण्यात आले. त्यानंतर आरोपी त्यांना वाहनातून सांगलीतील शामरावनगर परिसरातील एका गोठ्यात घेऊन गेले. तेथे तिघांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

मारहाणीनंतर उपासे यांना पुन्हा पुण्यात सोडण्यासाठी आरोपी निघाले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी कडेगाव ते कराड मार्गावरील टेंभू योजनेच्या कॅनॉलमध्ये मृतदेह फेकून दिला.
दरम्यान, शामरावनगर परिसरात एका व्यक्तीला आणून मारहाण केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे तपास सुरू केला असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
गोविंद उपासे बेपत्ता असल्याची तक्रार पुण्यातील नांदेड सिटी पोलीस ठाण्यात दाखल होती. सांगली पोलिसांच्या तपासातून या बेपत्ता प्रकरणाचा हत्येशी संबंध समोर आला. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, पुढील तपास सुरू आहे.







