सासवड, (पुणे): पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर दुमेवाडी (ता. पुरंदर) ग्रामपंचायत हद्दीत रस्ता ओलांडत असताना एसटी बस व लुना या दुचाकीचा झालेल्या अपघातात 67 वर्षीय दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (ता. 10) सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास जाधवगड कमानीच्या वरच्या बाजूला हा अपघात झाला. याप्रकरणी एसटी चालकावर सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय काळूराम कोंढाळकर (वय 67, रा. जाधववाडी, ता. पुरंदर) असे अपघातात मयत झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. तर ज्ञानेश्वर तुळशीराम भांदुर्गे (वय-31, बारामती डेपो, मुळ रा. योवता, ता. रिसोड जि. वाशीम) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पृथ्वीराज अशोक ढुम. रा ढुमेवाडी दिवे ता पुरंदर यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी विजय कोंढाळकर हे टीव्हीएस कंपनीची दुचाकी घेवुन ढुमेवाडीवरुन जाधवगड रोड येथे घराकडे निघाले होते. रस्ता क्रॉस करीत असताना त्यांना भरधाव बारामती आगाराच्या एसटी बसने वेगाने येवून कोंढाळकर यांना जोरदार धडक दिली. जोरदार धडक बसल्याने डोक्यास गंभीर जखम होवून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला व त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, विजय कोंढाळकर हे दिवे पंचक्रोशीतील प्रगतशील शेतकरी म्हणून परिचित होते. शेतात सतत विविध प्रयोग करून पिक उत्पादने घेत होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.