उरुळी कांचन, (पुणे) : मुळा-मुठा नदीला आलेल्या भीषण पुरामुळे कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून पाण्याच्या प्रचंड वेगात एक 65 वर्षीय व्यक्ती वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाहून जाणाऱ्या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकले नसून त्यांचा शोध गावातील काही नागरिक घेत असल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी (ता. 03) सायंकाळी सहा ते सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे.

पाण्याच्या अतिवेगामुळे आणि पुराच्या तीव्र प्रवाहामुळे सदरचा व्यक्ती वाहून गेला असून, त्याचा शोध परिसरातील नागरिक घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र घटना होऊन अर्धा तास झाले तरी घटनास्थळी उरुळी कांचन पोलीस, महसूल विभागाचे अधिकारी अडय्प पोहचू शकले नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुळा-मुठा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्याने कोरेगाव मूळ येथील बंधारा पाण्याखाली गेला होता. पाण्याच्या अतिवेगाचा अंदाज न आल्याने किंवा धोकादायक प्रवास करताना बिवरी येथील 35 वर्षीय तरुण अचानक पाण्याच्या तीव्र प्रवाहात ओढला गेला आणि वाहून गेला. घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
स्थानिक नागरिक व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आले असले, तरी नदी पात्रातील पाण्याचा प्रचंड वेग आणि वाढती पातळी यामुळे अडथळे निर्माण होत आहेत. एका निष्पाप तरुणाचा जीव धोक्यात आल्यानंतर आता स्थानिक नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या 15 दिवसांपूर्वीच ‘पुणे प्राईम न्यूज’ने या बंधाऱ्यावरून सुरू असलेल्या अत्यंत धोकादायक वाहतुकीचा आणि पाण्याच्या विसर्गाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. पाणी बंधाऱ्यावरून वाहत असतानाही नागरिक व वाहनधारक प्राणाची बाजी लावून बंधारा ओलांडत होते.
मात्र, हा इशारा मिळूनही उरुळी कांचन पोलीस, महसूल विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंना पक्के बॅरिकेड्स लावणे किंवा पोलीस बंदोबस्त तैनात करणे गरजेचे होते, मात्र प्रशासनाने कोणतीही खबरदारी घेतली नाही.
दरम्यान, “वेळेवर इशारा देऊनही जर उरुळी कांचन पोलीस, महसूल विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने ही गोष्ट गांभीर्याने घेतली असती, तर आज ही दुर्घटना सहज टाळता आली असती. प्रशासनाच्या या ढिम्म आणि बेजबाबदार कारभारामुळेच एका तरुणाचा बळी जात आहे. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे.”







